चर्चा: प्रियंका गांधींच्या निमित्ताने घराणेशाहीची पुन्हा चर्चा

अशोक सुतार

प्रियंका गांधी यांची अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. प्रियंका यांच्या निवडीवर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियंका गांधी यांचे नाव न घेता, काही लोकांसाठी परिवारच पक्ष असतो, अशी टीका केली. मोदी यांनी असे म्हणून कॉंग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली आहे. त्यामुळे देशभर कॉंग्रेसमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील सक्रियतेबद्दल बिहारमधील एक मंत्री आणि भाजपा नेते विनोद नारायण झा यांनी म्हटले आहे की, प्रियंका गांधी फक्‍त दिसायला सुंदर दिसतात; परंतु त्यांचे कर्तृत्व काहीच नाही. भाजपचे काही नेते, कॉंग्रेस हा पक्ष एका कुटुंबाचा असल्याची टीका नेहमी करतात. प्रियंका गांधी यांची कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्‍ती झाल्यानंतर मोदी यांनी भाजपाच्या इत्तर नेत्यांची री ओढत कॉंग्रेसवर टीका केली. मोदींनी कॉंग्रेसकडे एक बोट दाखवले परंतु त्यांच्याकडे चार बोटे आहेत हे विसरू नये. कॉंग्रेसवर टीका करताना मोदी भाजपा पक्षातील घराणेशाहीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत का, हे पाहणे गरजेचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जरी भाजपाकडून कॉंग्रेसवर घराणेशाहीचे आरोप होत असले तरी भाजपमध्येही घराणेशाही अस्तित्वात आहे. कॉंग्रेसमध्ये उघडपणे घराणेशाहीचे दर्शन दिसते तर भाजपामध्ये कॉंग्रेसच्या तुलनेत ती कमी प्रमाणात दिसून येते. कॉंग्रेसमध्ये एकाच कुटुंबाचे चालते; परंतु भाजपमध्ये घराणेशाहीचे कॉंग्रेसप्रमाणे केंद्रीकरण झालेले नाही. परंतु भाजपमध्ये घराणेशाही अनेक ठिकाणी आहे. ती प्रत्येक पक्षात असते. त्यामुळे कॉंग्रेसच्या घराणेशाहीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. भाजपमधील घराणेशाहीची अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरपंत फडणवीस हे विधानपरिषदेचे सदस्य होते. देवेंद्र फडणवीस यांची काकी शोभा फडणवीस या महाराष्ट्रात मंत्री होत्या. राज्याचे माजी मंत्री व भाजपचे अजूनही नेते असलेले एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे या राज्यामध्ये मंत्री आहेत. तर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड मतदारसंघातून मुंडेंच्या कनिष्ठ कन्या प्रितम यांना लोकसभेवर पाठवण्यात आले आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपचे नेते विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित या 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

गावित यांचे बंधू राजेंद्र गावित हे गतवर्षी मे महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे पुत्र दुष्यंत सिंग हे थौरपूरमधून खासदार आहेत. वसुंधराराजेंची बहीण यशोधराराजे सिंधिया या मध्य प्रदेशातील शिवराजसिंग चौहान यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या. वसुंधराराजे यांच्या आई विजयाराजे या पूर्वी जनसंघापासून राजकारणात होत्या. भाजपच्या स्थापनेपासून पक्षबांधणीमध्ये विजयाराजे यांचा वाटा आहे. एवढेच काय वसुंधराराजे यांचे बंधू माधवराव सिंधिया हे कॉंग्रेसमधील बडे नेते होते.

माधवराव यांचे पुत्र ज्योतिरादित्य सिंधिया हे सध्या मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघाचे खासदार आहेत. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांचे पुत्र अभिषेक हे लोकसभेचे खासदार आहेत. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रेम कुमार धुमाळ यांचे पुत्र अनुराग ठाकूर हे हमीरपूरचे खासदार आहेत. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा हे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे पुत्र पर्वेश वर्मा हे दिल्ली पश्‍चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंग यांचे पुत्र राजीव सिंग हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. भाजपशी सलगी असलेले महंत अविद्यनाथ यांनी आपले वारस म्हणून योगी आदित्यनाथ यांना पुढे आणले. ते उत्तर प्रदेशाचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

एका आकडेवारीनुसार, 16 व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीच्या माध्यमातून निवडून आलेल्या भाजप खासदारांच्या यादीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र असा अनुक्रम लागतो. मोदींच्या मंत्रिमंडळातील 75 पैकी 15 नेते हे राजकारणात सक्रीय होण्यापूर्वी त्यांना कौटुंबिक राजकीय पार्श्‍वभूमी आहे. घराणेशाहीमुळे त्यांना उमेदवारी मिळाली, ते निवडून आले. भाजपच्या देशातील 10 मुख्यमंत्र्यांपैकी 3 मुख्यमंत्री हे घराणेशाहीच्या माध्यमातून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले आहेत. सध्या लोकसभेत 22 टक्के सदस्य हे घराणेशाहीमुळे निवडून आले आहेत. कॉंग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात घराणेशाहीमुळे निवडून आलेल्या सदस्यांचा आकडा तीस टक्‍के होता.

भाजपमधील सुमारे 44 टक्‍के खासदार हे घराणेशाहीमुळे लोकसभेत निवडून आल्याचे निरीक्षण हॉंगकॉंग विद्यापीठातील अभ्यासक रोमन कार्लेव्हॅन यांनी नोंदवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही घराणेशाहीचे वर्चस्व दिसून येते. प्रत्येक पक्ष यात अग्रेसर आहे. त्यामुळे कॉंग्रेसवर घराणेशाहीची टीका करणे हे कोणत्याही पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला शोभणारे नाही. घराणेशाही फक्‍त कॉंग्रेसमध्येच आहे, असे भासविण्याचा प्रयत्न करणारे नेते लोकांची दिशाभूल करत आहेत, असे दिसते. सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी आपल्या कार्यशक्‍तीचा वापर करण्याची गरज आहे, लोकांची या मुद्द्यावर दिशाभूल करणे चुकीचे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)