#चर्चा: क्षणिक आनंदासाठी करिअर दावणीला? 

मिलन म्हेत्रे 
गणेश विसर्जन मिरवणुकीत अथवा एखाद्या उत्सवाच्यावेळी वाजवण्यात येणारी डॉल्बी डिजिटल साऊंड सिस्टीम अर्थात डीजे ध्वनीप्रदूषणाला कारणीभूत होत आहे. मात्र, न्यायालयाचे आदेश धुडकावत जे तरुण डीजे लावताना दिसतात, त्यांच्यावर होणाऱ्या पोलीस कारवाईमुळे अल्प वयातच त्यांचे करिअर दावणीला बांधले जात आहे. एक चर्चा…
“गणेश विसर्जन काळात डीजेचा आवाज सहन होत नाही,’ असे फोन 100 या नंबरवर यावर्षी बरेच आले. “किती वेळ चालणार हा धुडगूस? न्यायालयाने डीजेंच्या आवाजावर बंदी आणली तरी कसे काय वाजताहेत इतक्‍या जोराने? असे प्रश्‍न अनेक लोक विचारत होते. तर, “एक दिवसाने काय होतंय? उत्सव आहे; थोडं सहन करायला शिका की… नाही तर दुसरीकडे जा रहायला…’ हे मिरवणुकीतील तरुणांचे उत्तर होते. हे सगळे पाहिल्यावर, “उत्सव म्हणजे नक्की काय? हा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. डीजेप्रकरणी यावर्षी सुमारे 101 सार्वजनिक गणेश मंडळांवर पुण्यात कारवाई करण्यात आली. मंडळांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी वारंवार सांगूनही जेव्हा त्याकडे दुर्लक्ष करून स्पीकर चालूच ठेवले.नंतर पोलिसांनी स्पीकरचे मिक्‍सर जप्त करण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी पोलिसांनाच धक्काबुक्की करण्याचे प्रकार घडले. ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले, शासकीय कामात अडथळा आणला व पोलीस कर्मचाऱ्यांनाच धक्काबुक्की केली म्हणून पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
ध्वनिप्रदूषणाच्या कायद्याबाबत यावर्षी गणेश मंडळांना सार्वजनिक उत्सव सुरू करण्यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्तांच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठकाही झाल्या होत्या. बहुतांश मंडळांनी उत्सवात याबाबत सहकार्य करण्याचे आश्‍वासनही आयुक्तांना दिले होते. मात्र, ऐनवेळी काही मंडळांनी कायद्याच्या विरोधात भूमिका घेतली. डीजेच्या वापराबाबत ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार डीजेचे चालक-मालक, मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्यावर कारवाई झाली आहे. ज्यांच्यावर कारवाई होते आहे किंवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो गट साधारण 20 ते 30 या वयोगटातील तरुणांचा आहे. हा वयोगट ऐन उमेदीच्या काळातील आहे. त्यामुळे अशा वयोगटातील तरुणांवर गुन्हा दाखल होत असेल तर ते त्यांच्या “करिअर’ला निश्‍चितच बाधक ठरणारे आहे.
आज 20 ते 30 वयोगटातील तरुण शिक्षणाबरोबरच अर्थार्जनासाठीही प्रयत्न करीत असतात. त्यांना या काळात अनेक चांगल्या संधी प्राप्त होतात. मात्र, केवळ एक दिवसाच्या आनंदासाठी आयुष्यातील मोठ्या संधींना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यामुळे मुकावे लागणार आहे. कोणत्याही कारणासाठी गुन्हा दाखल असेल, कोर्टात केस चालू असेल, तर पासपोर्ट-व्हिसा मिळणे, सरकारी-निमसरकारी, आयटी, बीटीमधील नोकरी मिळणे, याचबरोबर कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवण्याची संधी मिळणार असेल तर यात बाधा येऊ शकते. आपल्या आयुष्यातील हा “टर्निंग पॉइंट’ असतो, हे सण-उत्सव काळात देखील आपण विसरता कामा नये. कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तर ते कायमस्वरूपी रेकॉर्ड तयार होते, त्यामुळे भविष्यात एखादी साधर्म्य असलेली घटना घडली, तर संशयित म्हणून देखील अशा व्यक्तींकडे पाहिले जाते, किंवा त्यांना अटक होते. आजचा तरुण सूज्ञ असून कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचे, प्रदूषणासारख्या गोष्टींना आळा घालण्यासाठी काय करायचे, हे त्याला समजते. त्यामुळेच उत्सव विधायक असावा, विघातक असू नये. एवढाच, याचा अर्थ!
ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कायद्यानेच डीजे-डॉल्बींना बंदी घातली आहे. कायदा श्रेष्ठ आहे आणि त्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने योग्य पद्धतीने कार्यवाही केली आहे. लो. टिळकांनी देशाचे स्वातंत्र्य समोर ठेवून गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू केला. आज गणेशोत्सव वैश्‍विक झाला आहे, त्यामुळे उत्सवाची व आपल्या देशाची प्रतिमा जपण्याचे काम आता तरुणांनीच करावयाचे आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे. तिचे पावित्र्य जपूनच उत्सव साजरा झाला पाहिजे. नियमानुसार दोन-चार स्पीकर मर्यादित आवाजात लावून त्यावर देशभक्तीची, भावगीते, शौर्यगीते लावून विसर्जन मिरवणुकीचे पावित्र्य जपणे शक्‍य आहे. या प्रबोधनासाठी मानाच्या गणपतीसह मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे यावे. 
– अशोक गोडसे, 
अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट 
डीजे-डॉल्बी बंदीचा न्यायालयीन निर्णय हा महाराष्ट्र राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रानुसार दिला गेला आहे. या समस्येबाबत सरकारने असमर्थता व्यक्‍त केली होती. या निर्णयानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या प्रकारात 101 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कालांतराने राजकीय स्वार्थापोटी ते मागेही घेतले जातील. ध्वनिप्रदूषणाबाबत सन 2000 पासून प्रबोधन चालू आहे, त्याला 18 वर्षे झाली आहेत. नुसते गुन्हे दाखल करून उपयोग नाही, तर याबाबत लेखी माफीनामे, प्रतिज्ञापत्र घेणे गरजेचे आहे आणि ते रेकॉर्डवर येणेही आवश्‍यक आहे. अन्यथा न्यायालयीन आदेश कागदोपत्रीच राहतील. 
– ऍड. असिम सरोदे
ध्वनिवर्धकांवर बंदी हा न्यायालयाचा निकाल सर्वधर्मीयांसाठी आहे. त्याचे पालन सर्वांनीच करणे गरजेचे आहे. मिरवणुकांमधील बिभत्स गाणी, त्यावर होणारे त्याच प्रकारचे डान्स, दारूचा मुक्‍त वापर हे सगळे पाहता “डीजे नकोच’ असे म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आवाजाची विशिष्ट पातळी राखणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. यावर्षी 101 गणेश मंडळांवर गुन्हे दाखल झाले. वयाच्या 22-23 व्या वर्षीच एखाद्या पोलीस ठाण्यात नाव रेकॉर्डला लागले की, करिअर संपुष्टात येते, हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. भविष्यात येणाऱ्या आयुष्याच्या अनेक संधी हे तरुण गमावणार आहेत, हे नक्की. 
– ऍड. शिवराज कदम 
पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काम केले आहे. त्यांनी ध्वनिप्रदूषण कायद्याबाबत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर उत्सव सुरू होण्यापूर्वी बैठका घेतल्या होत्या आणि सर्व गोष्टींची जाणीव त्यांना दिलेली होती. पदाधिकाऱ्यांनीही सहकार्याची भावना व्यक्‍त केली होती. विसर्जन मिरवणूक काळात अनेक मंडळे चांगले देखावे सादर करतात; पण त्यांना न्याय मिळत नाही. मानाच्या मंडळांना लागणारा वेळ आणि त्यांना असणारे नियम, तसेच इतर मंडळांना लागू असणारे नियम यात तफावत असते. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही वेळा असंतोष उफाळून येतो आणि काही विघातक गोष्टी घडतात. अर्थात त्या चुकीच्याच आहेत. भविष्यातील चांगल्या संधी “पोलीस व्हेरिफिकेशन’मुळे जाऊ शकतात, हे देखील तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. 
– उदय जगताप, 
आदर्श मित्र मंडळ, कार्याध्यक्ष, धनकवडी 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)