घोलपवाडी जिल्हा बॅंकेस टाळे ठोकले

आश्‍वासनानंतर आंदोलन मागे : आठ दिवसांनंतर निघाला तोडगा

भवानीनगर- घोलपवाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या दारात आठ दिवसांपासून सुरू असलेले उपोषणाला बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला बगल दिली. त्यामुळे संतप्त झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी आंदोलन करीत शाखेस टाळे ठोकले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पुणे जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापसिंह चव्हाण यांनी दूरध्वनीवरून शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्या (दि. 16) शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर बॅंकेचे कामकाज सुरू झाले.

जिल्हा बॅंकेच्या घोलपवाडी शाखेअंतर्गत उदमाईवाडी, घोलपवाडी, उद्धट, तावशी, पवारवाडी, थोरातवाडी सोसायट्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांचे पिक कर्ज व इतर कर्ज हे 31 मार्चअखेर पूर्णपणे परतफेड केल्यास जिल्हा बॅंक शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने पिक कर्जवाटप करते. शेतकरी अगोदरच आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला असल्याने काही शेतकऱ्यांनी कर्ज नवे- जुने करण्यासाठी हात उसने, दागदागिने गहाण ठेवून तसेच खासगी सावकाराकडून पैसे गोळा करून बॅंकेच्या खात्यात भरले. परंतु पैसे भरल्यानंतर आजतगायत शेतकऱ्यांना बॅंकेने नव्याने पिक कर्ज दिले नाही. तसेच सोसायटीच्या सचिवांचे सह्यांचे अधिकारी काढून घेतले होते.

उदमाईवाडी येथील सोसायटीच्या सचिवास सह्यांचे अधिकार देण्यास जाणीवपूर्वक खोडा घातल्याने संतप्त शेतकऱ्यांनी घोलपवाडी येथील जिल्हा सहकारी बॅंकेच्या शाखेच्या दारात शेतकऱ्यांनी आठ दिवसांपासून टाळ मृदंग घेऊन भजन म्हणत धरणे आंदोलन सुरू केलेले होते. आम्हा शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत रोज हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. परंतु याकडे बॅंक प्रशासनाने दुर्लक्षित केले. त्यामुळे संतप्त स्वाभिमानीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी शाखेस टाळे ठोकले.

आंदोलनात श्री छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांनी मध्यस्थी करीत अधिकारी यांच्याशी संपर्क साधत शेतकऱ्यांचा प्रश्‍न गंभीर झाला असून त्यांच्या डोक्‍यावर बाहेरून पैसे घेतलेले आहेत. ते देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना पिक कर्ज, मध्यम मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज देणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा बॅंक व्यवस्थापकीय संचालक प्रतापसिंह चव्हाण यांनी उद्याची तारीख दिल्याने बॅंकेचे टाळे शेतकऱ्यांनी काढले.

यावेळी इंदापूर पंचायत समितीचे सभापती करण घोलप, विभागीय अध्यक्ष पश्‍चिम महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटना अमरसिंह कदम, संतोष ननवरे, संभाजी जाधव, पवारवाडी सरपंच प्रशांत करे, उपसरपंच सतीश चव्हाण, उद्धटचे सरपंच रवींद्र यादव, उपसरपंच संतोष चव्हाण, उद्धट सोसायटीचे चेअरमन जयेंद्र चव्हाण, घोलपवाडी सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात, मोहन मोरे, बाळासाहेब चव्हाण, मधुकर चव्हाण, शरद थोरात, विशाल काळे, नानासाहेब बाबर, सर्व शेतकरी सहभागी झाले होते.

  • राजकारणासाठी शेततकऱ्यांची अडवणूक
    गेली आठ दिवस झाले आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. बॅंकेच्या दारात बसून राहिलो आहोत. दि. 31 मार्चच्या आत कर्ज परतफेड करूनही आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. इंदापूर तालुक्‍याच्या राजकारणासाठी आम्हा शेतकऱ्यांची आशा प्रकारे अडवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे राजकारणाचे देणेघेणे नाही. आमच्यापुढे अनेक समस्या आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय हवा आहे. असे संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.