घर सोडलेल्या महिलेला मिळाला “आशेचा किरण’

बसस्थानक पोलीसांची कामगिरी; सोशल मिडीयावरील प्रेमामुळे सोडले होते घर

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी)

अलीकडचा जमाना सोशल मीडियाचा म्हणून ओळखला जातो. या सोशल माध्यमाचा चांगला वापर करण्याऐवजी चुकीचा वापर करण्यामध्ये आजची तरुण पिढी अग्रभागी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशीच एक घटना साताऱ्यात घडली, सातारा जिल्ह्यातील एका उच्च शिक्षित तरुणीचा विवाह तिच्याच नात्यातल्या युवकाशी नुकताच झाला होता. मात्र, तिला सोशल मीडियावरील मित्रांची भलतीच भुरळ पडली होती. तिने चक्क सातारा बसस्थानकातून तिच्या पतीला चकवा देत पळ काढला होता. सातारा बसस्थानक पोलीस चौकीत तिची मिसिंगची तक्रार दाखल होताच तिचा शोध घेऊन तिला आशा किरण या सामाजिक संस्थेत दाखल केल्याने तिला “आशेचा किरण’ मिळाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील एका गावातील उच्च शिक्षित युवती तिच्या पतीसह सातारा बसस्थानकात दि.16 रोजी आली होती. दरम्यान तिने पतीला लघुशंकेचे कारण सांगून निघून गेली, बराच वेळ झाल्याने ती परत न आल्याने तिची वाट पाहून वैतागलेल्या पतीने बस स्थानक पोलीस चौकी गाठली. बसस्थानकातून पत्नीचे अपहरण झाल्याचे त्याने सांगताच बसस्थानक पोलीस चौकीतील पोलीस हवालदार दत्ता पवार, प्रवीण पवार, अरुण दगडे, केतन शिंदे यांनी त्यास आधार देत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ती मुंबईच्या बसमध्ये बसून गेल्याचे समोर आले. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसींग दाखल झाले होते.

दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या सूचनेनुसार बसस्थानक पोलीसांनी तपास सुरू केला. तिच्याबाबत अधिक चौकशी केली असता व तिचे मोबाईल कॉल डिटेल्स काढल्यानंतर ती एका मित्रा सोबत निघून गेल्याचे पोलीसांच्या लक्षात आले.पोलीसांनी तिच्या एका मित्राला चौकशीला ताब्यात घेतल्यानंतर ती युवती नालासोपारा येथे तिच्या मित्रासोबत असल्याचे पुढे आले.

पोलीसांनी त्या मित्राकरवी तिला संपर्क करून बोलवण्याची नामी शक्कल काढली. त्यानंतर ती मित्राच्या सांगण्यावरून महाड येथे येण्यास तयार झाल्यानंतर पोलीसांनी साध्या वेशात महाड बसस्थानकात सापळा लावून तिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला सातारा शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिने नवऱ्यासोबत नादंण्यास नकार दिला, तसेच माहेरी जाण्यासही नकार दिल्याने तिचे नेमके काय करायचे असा प्रश्‍न पोलीसांच्यापुढे निर्माण झाला.

अखेर वरिष्ठांशी व त्या यवुतीच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून तिला आशा किरण या संस्थेत दाखल करण्याचा निर्णय पोलीसांनी घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.