घटनेतील खरे उंदिर, घुशी कोण आहे, याचा शोध घ्या

आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांची उपरोधिक टिका ः शिवसेनेने मुलाला केली मदत

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 28 – मुठा कालव्याची भिंत उंदीर आणि घुशींनी पोखरल्याचा शोध पाटबंधाऱ्याच्या काही अधिकाऱ्यांनी लावला आहे. मात्र, बेकायदेशीरपणे वीज विभाग आणि खाजगी कंपन्यांच्या केबल टाकल्या आहेत, त्याकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी यातील उंदीर आणि घुशी कोण आहेत याचा शोध लावावा, अशी उपरोधिक टीका शिवसेना प्रवक्‍त्या, आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दांडेकर पुलाजवळ मुठा कालव्याची भिंत कोसळल्यामुळे सिंहगड रस्त्यासह आसपासच्या परिसरात पाणी घुसले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे संसार उघड्यावर आले आहेत. दरम्यान, डॉ. निलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची विचारपूस करत आर्थिक मदत केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पुण्याला पालकमंत्री असले तरी पुणे अनाथ असल्याची भावना आज निर्माण होते. शिवसेना पीडित लोकांना मदत करत आहे. तर, दुसरीकडे सुरक्षिततेचा विचार करून जलवाहिनी आणि कालव्याचे काम करणे आवश्‍यक होते.

परंतु, महापालिकेतील आजी व माजी सत्ताधारी यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिका या दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप गोऱ्हे यांनी केला. या घटनेमध्ये एका कुटुंबातील पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेली रोख रक्‍कम वाहून गेली. त्याची खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेत पक्षाच्या वतीने त्या मुलाल मदत करण्याची सूचना निलम गोऱ्हे यांना देण्यात आली. त्यानुसार निलम गोऱ्हे, शिवसेनेचे नेते नितीन बानूगडे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्या कुटुंबाला मदतीचा धनादेश देण्यात आला. अन्नधान्य आणि भाज्यांची मदत देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)