ग्रेट पुस्तक : मीना कुमारी

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा माझा नमस्कार…

अनेकांनी जिच्यावर मुक्‍त कंठाने स्तुती सुमने उधळली… जिच्या येण्याने फिल्मी दुनियेत बहार आली… जिच्यासाठी वेडे व्हावें, असे प्रत्येक तरुणाईला वाटू लागले… अशी ती सदाबहार, 1950 चा काळ गाजवणारी मीनाकुमारी… तर आज मी तुम्हाला डॉ. श्रीकांत मुंदरगी लिखित मीनाकुमारी या पुस्तकाबद्दल म्हणजेच एक काळ गाजवणाऱ्या “ट्रॅजेडी क्वीन’बद्दल माहिती देणार आहे. मीनाकुमारीचे खरे नाव होते मेहजबीन तर पित्याचे नाव होते अलिबक्ष… मेहजबीनच्या घरची परिस्थिती खूपच बेताची होती. त्यामुळे तिला पैशासाठी चित्रपटात काम करावी लागली वयाच्या चौथ्या वर्षांपासून ती चित्रपटात काम करू लागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परिस्थितीमुळे तिला शिक्षणाला मुकावे लागले तिचा हा प्रवास तिच्या वडिलांनी ठरवला होता. पहिल्याच चित्रपटासाठी तिला मानधन मिळाले अवघे 25 रुपये अर्थात त्या काळी ते खूप होते. बाल कलाकार म्हणून ती नावारूपाला येऊ लागली तसे तिचे बेबी मीना असे नामकरण करण्यात आले. तिने अनेक चित्रपटात बाल कलाकाराच्या भूमिका केल्या आणि गाजवल्याही. वयाच्या सोळाव्या वर्षी तिचे पुन्हा एकदा मीनाकुमारी असे नामकरण झाले. तिने अनेक यशस्वी चित्रपट दिले “बैजू बावरा’च्या यशानंतर नंतर तिने मागे वळून पाहिले नाही.

ती जशी जशी वयात येऊ लागली तशी मनानेही फुलू लागली आणि यातच ती चंदन ऊर्फ कमाल अमरोही या दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली. कमाल अमरोही त्यावेळी स्रुप्रसिद्ध दिग्दर्शक होतेच तसेच उत्तम पटकथा लेखकही होते. त्यांच्या “महल’ चित्रपटाने तर त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. कमाल अमरोही हे अतिशय मनस्वी, जिद्दी, जातिवंत कलाकार होते. त्यांच्या कामात कोणी लुडबूड केलेली त्यांना अजिबात सहन होत नसे. देखणे व्यक्तिमत्व, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व अशा तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या कमाल यांच्या प्रेमात मीनाकुमारी पुरती वेडी झाली. कमाल यांनी तिच्या प्रेमाचा स्वीकार करून तिच्याशी निकाह केला. कमाल अमरोहींनी त्यांची पहिली पत्नी आणि मुलांना गावी पाठवून मीनाकुमारीसोबत संसार सुरु केला.

सुरुवातीची काही वर्षे सुखाची गेली. पण नंतर कमाल यांच्या मनस्वी वागण्याने त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये तितकेसे काम मिळेना आणि मीनाकुमारी यशाच्या पायऱ्या चढू लागली होती. मीनाकुमारीचे स्वच्छंदी वर्तन त्यांच्यातील वादाला कारण ठरू लागले. प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मीनाकुमारीला यश खुणावत होते. खरे तर यश तिच्या डोक्‍यात जाऊ लागले होते. यातच तिला दारूचे व्यसन जडले. कमाल अमरोहींची बंधने तिला नकोशी वाटू लागली. आणि एक दिवस कमाल अमरोहीचा सोन्याचा पिंजरा सोडून ती बाहेर पडली. तिच्या स्वैर वर्तनावर काबू ठेवणारे तिचे असे हक्काचे कोणीही उरले नाही. कमाल यांचा तिला घेऊन काढलेला “पाकिजा’ चित्रपट अर्धवट राहिला होता. नंतर तो पूर्ण करण्यात आला. मीनाकुमारीचे यश दिवसेंदिवस वाढू लागले तसे तिचे व्यसनही. ती पूर्णतः व्यसनाच्या आधीन झाली होती.

मीनाकुमारीचे आयुष्य नेहमीच वादग्रस्त ठरले. तिच्या चित्रपटातील प्रत्येक नायकासोबत तिचे नाव जोडले गेले. असे म्हटले जाते की तिच्या शेवटच्या काळात तिला फक्‍त दोनच गोष्टी हव्या होत्या एक म्हणजे तिच्या आवडत्या व्यक्ती सोबत वेळ घालवणे आणि दुसरे दारू. मीना कुमारी “ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखली गेली.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून एकूण आठ वेळा तिचे नामांकन झाले होते. सर्वोत्तम अभिनेत्री हा पुरस्कार तिला चारवेळा देण्यात आला. अभिनय तिच्या रक्‍तारक्‍तात भिनला होता हे वेगळे सांगायला नको. मीनाकुमारी म्हणजे अभिनयाचा शेवटचा शब्द असे मानले जात असत. धर्मेंद्र, राजेंद्रकुमार यांसारख्या नवोदित कलाकारांना मीनाकुमारीने घडवले. ती नेहमीच नवीन कलाकारांना प्राधान्य देत असे. तिच्या मृत्यूनंतर “पाकिजा’ला प्रचंड यश मिळाले. सौंदर्याची खाण असलेली मीनाकुमारी, असंख्य चाहत्यांची लाडकी मीनाकुमारी, पैसा प्रसिद्धीला अंगाखांद्यावर खेळवणारी मीनाकुमारी. शापित अप्सरा मीनाकुमारी. तिच्या जीवनाची अशी शोकांतिका व्हावी किती दुःखद. खरं तर ती एक दंतकथा बनून राहिली. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी हे पुस्तकं नक्की वाचा. यश आणि अपयश दोन्ही पचवता आले पाहिजे नाही तर “मीनाकुमारी’ व्हायला वेळ लागत नाही; कदाचित हाच संदेश आपल्याला हे पुस्तकं देऊन जाते.

– मनिषा संदीप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)