ग्रामीण रुग्णालय ठरताहेत पांढरा हत्ती

कुटुंब कल्याण राष्ट्रीय कार्यक्रमांचा बोजवारा
नगर – कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात नगर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे तो जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून होणाऱ्या कामामुळे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे प्रमाण दिलेल्या उद्दिष्ट्यापेक्षा जास्त आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये या राष्ट्रीय कार्यक्रमाचा बोजवारा उडाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये इच्छाशक्‍तीचा अभाव असल्याने कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे प्रमाण अत्यल्पच आहे. काही ग्रामीण रुग्णालयात वर्षभरात एकही शस्त्रक्रिया झाली नाही. त्यामुळे ही रुग्णालये पांढरा हत्तीच ठरत आहेत.
वर्षभरात दिलेले उद्दिष्टही ग्रामीण रुग्णालयांना पूर्ण करता आले नाही. 60 टक्‍के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सन 2017 – 18 या वर्षासाठी 24 हजार 719 कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्टय देण्यात आले होते. त्यापैकी 18 हजार 600 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सुमारे 70 टक्‍के प्रमाण आहे. त्यात जिल्हा रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय व 23 ग्रामीण रुग्णालय यांच्याकडून केवळ 4 हजार 161 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अर्थात, त्यांना 6 हजार 53 शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले होते, पण ते देखील त्यांना पूर्ण करता आले नाही. अर्थात, ग्रामीण रुग्णालय हे तालुका व मोठ्या गावांच्या ठिकाणी उभारण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रापेक्षाही या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असते. तरी कुटुंब कल्याणसारखा राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे.
जिल्हा परिषदेचे 96 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर करण्यात येतात. परंतु, तालुका व मोठ्या गावाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगर तालुक्‍यातील चिचोंडी पाटील, पारनेर, टाकळी ढोकेश्‍वर या ग्रामीण रुग्णालयात वर्षाभरात एकही शस्त्रक्रिया झाली नाही. अकोले तालुक्‍यातील राजूरमध्ये 9, संगमनेरातील समशेरपूरमध्ये 8, नेवासे 11, पारनेर 10, लोणी 39, पुणतांबे 31 या प्रमाणे वर्षभरात शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तालुका व मोठ्या गावातील रुग्णालयांमध्ये ही स्थिती आहे. त्यामुळे या रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे.
अर्थात, शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 541 शस्त्रक्रिया वर्षभरात झाल्या आहेत. तर, जिल्हा रुग्णालयात 883 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. परंतु, त्या तुलनेत प्राथमिक आरोग्य केंद्रात हे प्रमाण मोठे आहे. शस्त्रक्रिया करण्याबाबत उत्सुकता नसल्याने ग्रामीण रुग्णालयात हे प्रमाण कमी आहे.

खासगी रुग्णालयाचा पर्याय
ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याबाबत उदासिनता दाखविण्यात येत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचा पर्याय स्वीकारावा लागतो. त्यामुळे जास्त पैसे देखील रुग्णांना मोजावे लागतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)