ग्रामरक्षक दलाची घोषणा हवेतच

राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्ह परिषदेची संयुक्त घोषणा वाऱ्यावरच

– सागर येवले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बेकायदेशीर दारू तयार करून त्याची विक्री करणे आणि दारू पिऊन गावातील शांतता भंग करणाऱ्या तळीरामांसह व्यावसायिकांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक गावात “ग्रामरक्षक दल’ स्थापन करण्याची “दवंडी’ संपूर्ण जिल्ह्यात देण्यात आली. मात्र, दवंडी देऊन अनेक महिने झाले तरीही राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला त्याचा विसर पडल्याचे दिसून येते.

गावांमध्ये अवैद्य मद्यविक्री, बाळगणे आणि वाहतूक केली जाते. काही महाभाग तर दारू पिऊन गावांमध्ये धिंगाणा घालतात आणि सार्वजनिक शांतता भंग करतात. अशा व्यक्तींवर वेळीच कारवाई व्हावी, गावातील अवैद्य मद्यविक्रीचे व्यवसाय बंद व्हावे आणि गाव व्यसनमुक्त व्हावे यासाठी महाराष्ट्र दारूबंदी (सुधारणा) अधिनियमानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावांत “महाराष्ट्र ग्रामरक्षक दल’ स्थापन करण्याचा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या मदतीने हे दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत बैठकही झाली आणि येत्या महिन्याभरात प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल स्थापन करणार असल्याची घोषणाही करण्यात आली.

मात्र, या तळीरामांचा बंदोबस्त करता करता तत्कालीन राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आणि दल स्थापनेचे तीनतेरा वाजले. त्यानंतर तीन महिने होवूनही दलाची स्थापना झाली नाही.

लेखी सूचनेद्वारे स्थापन करण्याची सूचना देणार
दल स्थापनेविषयी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारणा केली असता, गावामध्ये ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी दलाची स्थापना झाली नसेल त्याठिकाणी पुन्हा लेखी सूचना देऊन दलाची स्थापना करण्यास सांगण्यात येणार आहे. तसेच चौकशीही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, ते केवळ आश्‍वासनापुरतेच राहिले आणि “पहिले पाढे पच्चावन्न’ अशी परिस्थिती पंचायत विभागाची आहे. पंचायत विभागाच्या या दिरंगाईमुळे तळीरामांचे फावले जात आहे. त्यामुळे कधी पंचायत विभागाला जाग येणार, कधी ग्रामरक्षक दल स्थापन होणार याबाबत ग्रामस्थांकडून प्रश्‍न उपस्थितीत केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)