ग्रामपंचायतींचा संसार आता स्वतःच्या घरात

292 ग्रामपंचायचींच्या कार्यालयांची स्वतंत्र इमारत उभारणार
-जिल्हा परिषदेचा निर्णय ः 4 कोटींच्या निधीची तरतूद

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 29 – गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत असलेली “ग्रामपंचायत’ ही त्या गावाचा “कणा’ असते. मात्र, हा कणा मोडकळीस आला असून, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचयतींना स्वत:चे स्वतंत्र कार्यालय नाही. बसण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे मिळेल त्या खोलीमध्ये ग्रामपंचायतीचा “संसार’ मांडावा लागत आहे. मात्र, आता या मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींना हक्काची जागा मिळणार आहे. जिल्ह्यातील 292 ग्रामपंचायतीच्या इमारतींचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील विविध विकासकामे केली जातात. शासकीय योजना ग्रामस्थांपर्यंत पोहचण्यास मदत होते. तसेच गावाच्या विविध नोंदी या जतन केल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचायत ही महत्त्वाची भूमीका बजावत असते. पुणे जिल्ह्यात एकूण 1 हजार 407 ग्रामपंचायती आहेत. मात्र, त्यातील काही ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीची जागा नाही. त्यामुळे गावातील एखाद्या भाड्याच्या खोलीत किंवा समाजमंदिरात या ग्रामपंचायतीचे कामकाज चालवले जाते. परंतू, त्यातील अनेक ग्रामपंचायती या मोडकळीस आल्या असून, शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यातच पावसाळ्यामध्ये पाणी गळणे हे प्रकार घडतात. त्यामुळे कागदपत्रांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींना स्वत:चे स्वतंत्र कार्यालय असावे, यासाठी जिल्ह्यातील 292 ग्रामपंचायती कार्यालयची स्वतंत्र इमारत उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.

त्यानुसार 1 हजारापेक्षा कमी लोकसंख्येच्या असलेल्या 143 ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यात येणार आहे. 2 हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या एकूण 100 ग्रामपंचायती कार्यालय तर, 2 हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 49 ग्रामपंचायत कार्यालय इमारती नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक भोर तालुक्‍यात 58 ग्रामपंचायती कार्यालयाच्या इमारती उभारण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ खेड येथे 48, आंबेगाव 2, बारामती 7, दौंड 13, हवेली 4, इंदापूर 30, जुन्नर 22, मावळ 30, मुळशी 21, पुरंदर 22, शिरूर 6 आणि वेल्हा येथे 29 असे एकूण 292 ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारती उभारण्यात येणार आहे.

कोट
जिल्ह्यातील 292 ग्रामपंचायतीचे कामकाज हे भाड्याच्या खोल्यांमधून, समाजमंदिर किंवा अन्य ठिकाणाहून चालत होते. परंतू, या इमारतींना स्वतंत्र इमारत उभारण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदेकडू 4 कोटी रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच डीपीसी आणि शासकीय स्तरावरून यासाठी भरीव निधीची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 292 ग्रामपंचायती कार्यालयाची स्वत:च्या हक्काची नवीन इमारती उभी राहणार आहे.
-संदीप कोहीणकर
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)