गौरी लंकेश-डॉ. दाभोलकर हत्येचे “कनेक्‍शन’?

तिघांना अटक करून आज न्यायालयात हजर करणार

पुणे – बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेऊन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) शुक्रवारी न्यायालयात हजर करणार आहे. अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा अशी त्या तिघांची नावे आहेत. तिघांना प्रॉडक्‍शन वॉरंटद्वारे न्यायालयात हजर करण्याची परवानगी मिळाली आहे. दरम्यान, सीबीआयने यापूर्वीच अटक केलेल्या सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत 1 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए.सैय्यद यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“काळे, दिग्वेकर आणि बंगेरा सध्या बेंगलोर येथे न्यायालयीन कोठडीत आहेत. तिघे सचिन अंदुरे याच्याशी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात संपर्कात होते. दाभोलकर प्रकरणातील दोन हल्लेखोरांनी शस्त्रांचे प्रशिक्षण कुठे घेतले, त्यांना शस्त्रे कोणी पुरवली, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल कोठे लपवून ठेवली आहे, याबाबत चौकशी करावयाची आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, शस्त्रे कोठे विल्हेवाट लावण्यात आली, याबाबत अंदुरे याच्याकडे सखोल तपास करावयाचा आहे. सदर गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, पिस्तूल याचा शोध सीबीआय घेत असून त्यादृष्टीने अंदुरेकडे चौकशी करण्यात येत आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अंदुरे याला गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयचा तपास प्रगतीपथावर असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. दुसरा हल्लेखोर शरद कळसकर आहे. त्या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करावयाची असल्याने अंदुरेच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ करावी,’ अशी मागणी सीबीआयचे विशेष वकील विजयकुमार ढाकणे यांनी केली.

या मागणीला बचाव पक्षाचे वकील धर्मराज चांडेला यांनी विरोध केला. ते म्हणाले, “कळसकरला मुंबई प्रकरणात 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांना समोरासमोर बसवून चौकशी कशी करणार, मागील चार दिवसांच्या पोलीस कोठडीत तपासच झालेला नाही.’ मात्र, “उच्च न्यायालच्या आदेशानुसार तपासातील गोपनीयता पाळली जात आहे. दररोज झालेला तपास केस डायरीमध्ये नोंदवत आहे. नालासोपारा स्फोटकेप्रकरणात कळसकरच्या पोलीस कोठडीत वाढ झाली असली, तरीही सीबीआय एटीएसशी समन्वय साधून तपास करेल, असे अॅड. ढाकणे यांनी सांगितले.

वकीलपत्र घेण्यापूर्वीच युक्तीवाद
युक्तीवाद करण्यापूर्वी वकिलांनी वकीलपत्र घेणे कायद्याने आवश्‍यक आहे. यापूर्वी या प्रकरणात प्रकाश साळशिंगीकर यांनी युक्तिवाद केला आहे. मात्र, ते गुरूवारी न्यायालयात हजर राहू शकले नाही. त्यामुळे बचाव पक्षातर्फे धर्मराज चांडेला यांनी बाजू मांडली. मात्र, त्यांनी त्यांनी वकील पत्र न घेता युक्तीवाद केला. हे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर धर्मराज यांनी वकीलपत्र घेतले.

शुक्रवारी हजर करणाऱ्या तिघांनीच केली रेकी
अंधश्रद्धा निमूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश हत्याप्रकरणात अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा या तिघांनीच रेकी केल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दोन्ही घटनांमधील कनेक्‍शन आता उघड होणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी 7.65 एमएम या पिस्तुलाचाच वापर झाला होता. या दोन्ही हत्यांसाठी एकाच पिस्तूलाचा वापर झाला काय, या दृष्टीने सीबीआय तपास करत आहे. याप्रकरणी न्यायालयाने चौघांविरोधात प्रॉडक्‍शन वॉरंट जारी केले आहे. पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयाने याप्रकरणी प्रॉडक्‍शन वॉरंटसाठी सीबीआयला परवानगी दिली आहे. शरद कळसकरचे यापूर्वीच प्रॉडक्‍शन वॉरंट निघाले असून सोमवारी काळे, बंगेरा आणि दिगवेकर यांच्या प्रॉडक्‍शन वॉरंटला परवानगी दिली आहे. नालासोपारा प्रकरणातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यावरच कळसकर याला अटक करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)