गौतम बुद्धांचे तत्वज्ञान

जो धम्म समतेवर आणि मानवतेवर आधारित आहे. ज्या धम्मात ईश्वराला मुळीच स्थान नाही. माणूस हा केंद्रबिंदू असून माणसाला महत्त्वाचे स्थान आहे, ज्या धम्मात मोक्ष नाही तर मार्ग आहे. जो धम्म विज्ञाननिष्ठ आणि शांतीच्या मार्गाचा आहे- अशा धम्माचे संस्थापक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती- म्हणजेच जन्मदिवस.

देवदह आणि कपिलवस्तू या दोन नगरांच्या सीमेवर एक सुंदर बाग आहे – लुंबिनी. या लुंबिनी वनात एका फुलारलेल्या शालवृक्षाखाली इ.स. 563 मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. आजही आणि यापुढेही त्यांचे विचार आणि तत्वज्ञान सर्व मानवजातील क्रांतिकारी असेच उपदेश आहेत. बुद्ध म्हणतात- मन घडविते तसा मनुष्य होतो. मनाला सत्याचा शोध करायला लावला पाहिजे. मनुष्याच्या सर्व व्यवहारांचे उगमस्थान मन आहे. मनुष्य जर दुष्ट चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधीही न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्याबरोबरच असते. त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्याबरोबर राहते. मन हे चंचल, ओढाळ, दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो. तसे बुद्धिमान व्यक्‍ती मनाला एकाग्र आणि सरळ करते. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्‍तीचे प्रमुख आहे.

प्रत्येक गोष्ट माणसाने आपल्या बुध्दीच्या पातळीवर घासून पाहावी. स्वानुभवांतून पटली तरच त्या गोष्टीचा स्वीकार करावा. सद्यःवर्तमान जीवनात मागच्या जन्माचा काडीमात्र संबंध नाही. याविषयी बुद्ध म्हणतात- माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते. पूज्य माणसांनो, तुम्हांला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता. हे तुम्हांस माहीत आहे काय? गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता. याबद्दल तुम्हांला काही ज्ञान आहे काय? उत्तर साहजिकच नाही असेच आहे.

परंतु एखादी व्यक्‍ती गरीब कुळात जन्माला आली तर त्याचे कारण गतजन्माचे दुष्कर्म आणि एखादी व्यक्‍ती श्रीमंताच्या घरात जन्माला आली तर मागच्या जन्माचे सत्कर्म, असे लोक अंधपणाने समजतात. त्यासाठी बुद्ध म्हणतात, ज्ञान म्हणजे प्रकाश. ज्ञानमार्ग हा सगळ्यांना मोकळा असला पाहिजे. मग तो पुरूष असो अथवा स्त्री.
अहिंसेबाबत बुद्ध म्हणतात – अहिंसा म्हणजे जीवहत्या न करणे. करूणा आणि मैत्री या दोहोंशी अहिंसेचा जवळचा संबंध आहे. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करा, म्हणजे तुम्हांला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते खाऊ नये.

बुद्ध हिंसेच्या विरूध्द होते, परंतु ते न्यायाच्याही बाजूचे होते. जेथे न्यायासाठी आवश्‍यक असेल तेथे बुद्धांनी बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती. अपराध्याला शिक्षा आणि निरापराधी माणसाची सुटका झाली पाहिजे. न्यायाधीशाने गुन्हेगाराला शिक्षा दिली तर तो न्यायाधीशाचा गुन्हा नाही. शिक्षेचे कारण गुन्हेगाराचा गुन्हा. जेव्हा शांतता राखण्यासाठी सर्व उपाय अयशस्वी ठरतात. तेव्हा होणाऱ्या हिंसेची जबाबदारी जो युद्ध करतो. त्याच्यावर येऊन पडते. दुष्ट शक्‍तींना कोणी कधीच शरण जाता कामा नये. युद्ध असू शकेल परंतु ते न्यायासाठी आणि नि:स्वार्थी हेतूने.

दुःखाविषयी बुद्ध म्हणतात- जगात सर्वत्र दुःखच दुःख भरलेले आहे. इच्छेप्रमाणे न होणे किंवा न मिळणे हेदेखील दुःख होय. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू ही सर्व दुःखे होत. तृष्णा दुःखाची जननी आहे. तृष्णा म्हणजे हवेहवेसे वाटणे. दुःख थोपविता येते. तृष्णेचा नाश म्हणजे दुःखाचा नाश. दुःख निवारण्याच्या उपायांत माणसाकडे अंधविश्वासापासून मुक्‍त असलेली दृष्टी असली पाहीजे, बुद्धिमान माणसाला योग्य असे उच्च विचार असले पाहिजेत, सत्ययुक्‍त दयेने भरलेली आणि निष्कपट असलेली वाणी असली पाहिजे, शांत, प्रामाणिक आणि शुद्ध असलेले कर्म केले पाहिजे.

कोणालाही दुःख न देणारी आणि प्रामाणिक अशी उपजीविका असली पाहिजे, स्वतःला वळण लावण्याचा आणि स्वतःवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मन नेहमी जागृत आणि सावध ठेवले पाहिजे, आणि जीवनातील सत्याविषयी सखोल चिंतन आणि मनन केले पाहिजे. म्हणजेच, दुःख निवारणासाठी बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब प्रत्येक माणसाने केला पाहिजे. अष्टांगिक मार्गात प्रत्येक माणसाजवळ सम्यक दृष्टी सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे गुण असले पाहिजेत.

बुद्ध म्हणतात, माणसाने मन हे नेहमी जागृत ठेवले पाहिजे. बुद्ध तत्वज्ञानात असे म्हटले आहे की – घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे कारण असते. प्रत्येक कारण हे मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. दैवी चमत्कृतिवादाचे खंडण करण्यात भगवान बुद्धांचे तीन हेतू होते – पहिला हेतू माणसाला बुद्धीवादी बनविणे. दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे आणि तिसरा हेतू ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात. त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. म्हणजेच बुद्धांचा धम्म हा विज्ञाननिष्ठ आहे.
जगाच्या निर्मितीबाबत बुद्धांने मांडलेले विचार हे अतिशय प्रभावी आहेत. – जगाची निर्मिती एकदम झाली यावर बुद्धांचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे, असे ते मानतात.

दैवी शक्‍तीच्या आणि ईश्वराच्या कल्पनेतून भ्रामक समजुती उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी अंधळयांची माळ असते. त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्यांना दिसत नाही. मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही. आणि शेवटी असलेल्यांनाही दिसत नाही. ईश्वर जर कल्याणकारी आहे, तर माणसे खुनी, चोर, व्याभिचारी, खोटे बोलणारी, निंदक, लोभी, द्वेषी, विकृत अशी का होतात? सृष्टीकर्त्याच्या ठायी तो न्यायी आणि दयाळू असेल तर जगामध्ये इतका अन्याय, अफरातफर, चोरी, अज्ञान का फैलावत राहते? म्हणजेच मानवतावादी उदात्त दृष्टीकोन ठेवून माणसांनी वैज्ञानिक निकषावर विसंबले पाहिजे.

जगातील सर्व मानवजातीला शांतीचा समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला, तथागत भगवान गौतम बुद्धांने, शांत, मंद आणि उत्साह देतो तो चंद्रप्रकाश, बुद्ध धम्मात पौर्णिमेला अतिशय महत्वाचे स्थान आहे. कारण वैशाखी पौर्णिमेला बुद्धांचा जन्म झाला. उरवेला येथे बोधिवृक्षाखली बसले असता त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. याच दिवशी कुषीनारा येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले. ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान बुद्धांने कपिलवस्तूत महासमय सूताचा उपदेश दिला. आषाढी पौर्णिमेला गृहत्याग केला.

सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन केले. माघ पौर्णिमेस भगवान बुद्धांने वैशालीतील सारंदर चैत्यात आयुःसंस्कारांचा त्याग केला होता. आणि घोषणा केली होती की, आजपासून ती महित्यांनंतर तथागताचे परिनिर्वाण होईल. अशा या प्रकाशाने देदीप्यमान तेज ज्याने अखिल मानवजातीला दिले ते करूणासागर, करूणासागर, करूणेच लेणं तथागत भगवान गौतम बुद्ध होय. पंचशीलाची तत्व जर सर्व माणसांनी आचरणात आणली तर माणूस दुःख निवारण करू शकेल.

त्यात, कोणत्याही प्राणिमात्राला ठार करण्यापासून किंवा ठार करण्यास कारण ठरण्यापासून अलिप्त राहणे.
चोरीपासून म्हणजे दुसऱ्याची मालमत्ता लबाडीने किंवा बळजबरीने संपादन करण्यापासून अलिप्त राहणे.
असत्य भाषणापासून अलिप्त राहणे.
कामवासनेपासून अलिप्त राहणे.
मादक पेयापासून अलिप्त राहणे.
हीच ती पंचशीलाची तत्वे होत, या महामानवाला तथागत भगवान गौतम बुध्दांना त्रिवार वंदन !

डॉ. धनंजय लोखंडे,
संचालक व विभागप्रमुख, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)