गौतम नवलखांना यांना अटकेची शक्‍यता

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण ः हायकोर्टाचा तूर्तास दिलासा नाही
जामीन अर्जाची सुनावणीची तारीख आज निश्‍चित होणार

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी असल्याच्या संशय असल्याने आणि या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतलेल्या गौतम नवलखा यांना तूर्त अटकेला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला. याच प्रकरणी आनंद तेलतुंबडे यांचा उच्च न्यायालयात प्रलंबित असलेला अटकपूर्व जामीन अर्ज आणि नवलखा यांच्या अर्जावर एकत्रीत सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. ही तारीख निश्‍चित करण्यासाठी दोन्ही अर्जाची सुनावणी उद्या शुक्रवारी ठेवली आहे. त्यामुळे नवलखा यांना केव्हाही अटक होण्याची शक्‍यता आहे.

माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम करताना नवलखा यांना 12 नोव्हेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा दिला होता.

दरम्यानच्या काळात त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. तो दोन दिवसांपूर्वीच 12 नोव्हेंबरला फेटाळून लावला. यामुळे अटक होण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी तातडीने आज उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. या अर्जावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी सरकारी वकील ऍड. अरूणा कामत-पै यांनी जारेदार विरोध केला. गौतम नवलखा यांना या सुनावणीसाठी नियमित कोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्याची सरकारी वकिलांनी कोर्टाकडे मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेली मुदत 12 नोव्हेंबरला संपली आहे आणि पुणे न्यायालयानेही नुकताच अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आता मुदतवाढ देणे योग्य नाही. त्यांना जर मुदतवाढ हवी असेल तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, अशी भूमीका घेतली.
तसेच शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखांविरोधात तपासयंत्रणेकडे सबळ पुरावे उपलब्ध असल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करत पुणे सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने नवलखा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. या अर्जावर उद्या सुनावणी होणार असल्याने नवलखा यांना केव्हाही अटक होण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)