गोव्यातील बीचवर मुलीचा विनयभंग; पुण्यातील 11 जणांना अटक

दोघा अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी


मुलीचे फोटो काढण्यात आलेला मोबाईल जप्त

पणजी – गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचवर एका 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी पुण्यातील 11 पर्यटकांना शिताफीने पकडले आहे. हे सर्व जण गोव्यातून पळून जाण्याआधीच गोवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यातील दोघे जण अल्पवयीन असून त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. हे 11 जण गोव्यात पर्यटनासाठी आले होते. या सर्वांवर कळंगुट पोलिसांनी दंगा माजवणे, विनयभंग तसेच दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करणे अशा विविध आरोपाखाली अटक केली आहे.

याबाबत घटना स्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गोव्यातील बागा बीचवर ही मुलगी तिच्या 17 वर्षीय भावासह बसली होती. तिचे आई-वडील तिथून जवळच एका स्टॉलवर नाश्‍ता करत होते. त्याचवेळी 11 जणांच्या टोळक्‍याने पीडित मुलीचा विनयभंग केला. या मुलीचे फोटो काढताना तिची छेड काढण्याचा प्रयत्नही या टोळक्‍याने केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीडितेच्या भावाने त्यांना प्रतिकार केला असता, त्याला मारहाण करण्यात आली. याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी कळंगुट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तातडीने पावले उचलत गोवा सोडून जाण्याआधीच सर्व आरोपींना अटक केली आहे. 11 जणांपैकी 2 जण 15 वर्षांचे असून त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, असे पोलीस अधिकारी जिवबा दळवी यांनी सांगितले.

ज्या मोबाईलमधून पीडित मुलीचे फोटो काढण्यात आले आहेत तो मोबाइल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी अडकलेल्या 11 जणातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी पणजीजवळील मेरशी येथे असलेल्या अपना घरात करण्यात आली आहे. पुण्यातील मुलांचा हा गट दोन दिवसांपूर्वी गोव्यात फिरण्यासाठी आला होता.

अटक करण्यात आलेल्यात रमेश कांबळी, संकेत भादले, कृष्णा पाटील, सत्येम लंबे, अनिकेत गुरव, ऋषीकेश गुरव, आकाश सुवास्कर, सनी मोरे व ईश्वर पांगरे यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी पुण्याचे रहिवाशी आहेत. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलांची एनजीओच्या उपस्थितीत जबानी नोंद केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक महेश नाईक निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)