गोपूजमधील बेकायदा उत्खननप्रकरणी

जनता क्रांती दलाचे वडूजमध्ये बेमुदत धरणे आंदोलन

वडूज, दि. 18 (प्रतिनिधी) – गोपूज, ता. खटाव गावच्या हद्दीत राजपद इन्फ्राकॉन प्रा. लि. या कंपनीतर्फे सोपान निवृत्ती खराडे यांच्या तात्पुरत्या परवान्याचा वापर करून बेकायदेशीरपणे दगड, खडीक्रश उत्खनन केले असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी जनता क्रांती दलाच्यावतीने येथील तहसिलदार कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात ऍड. संतोष कमाने, दत्तात्रय केंगारे, विकास सकट, अस्मिता फाळके, राजेंद्र नामदास, कांतीलाल खवळे, तानाजी भोंडवे, ऋतुराज लोखंडे, रोहित तुपे, माधव बाबर, निलेश चव्हाण, सागर फाळके आदी सहभागी झाले आहेत.

जनता क्रांती दलाच्यावतीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण-पुसेगाव-औंध-गोपूज-म्हासुर्णे-निमसोड मार्गे आटपाडी (जि. सांगली)पर्यंत राज्य मार्ग 147 रस्ता मंजूर करण्यात आला आहे. कामाचे ठेकेदार राजपद इन्फ्राकॉन कंपनीने गोपूज-औंध रस्त्यालगत भावलिंग डोंगर पायथा व मध्यभागी खाण पाडून त्यावर खडीक्रशर बसवून बेसुमार दगडाचे उत्खनन सुरू केले आहे. त्यासाठी संबंधिताने तहसिलदारांकडून 500 ब्रास दगड उत्खनन परवाना व उपजिल्हाधिकारी यांच्याकडून 400 रूपये प्रति ब्रासची परवानगी घेतली आहे. त्यानुसार संबंधिताने तहसिल कार्यालयात दोन लाख तर गौण खनिज विभागाकडे 5 हजार ब्राससाठी 20 लाख शासनाकडे भरले आहेत. कंपनीस 31 मार्च अखेर 5 हजार ब्रास दगड उत्खनन करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना दिला आहे. मात्र, स्टोन क्रशर मालकाने नियम धाब्यावर बसवून बेसुमार दगडाचे उत्खनन सुरू केले आहे. तात्पुरता खाणपट्टा परवाना असताना तसेच पर्यावरण विभागाची कोणतीही ना-हरकत प्रमाणपत्रे नसताना प्रदुषण व नैसर्गिक साधन संपत्तीची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. उत्खननासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टींगमुळे परिसरात ध्वनी प्रदूषण होत असून घरांना हादरे बसत आहेत. क्रशरमुळे धुळीचे प्रमाण वाढून त्याचा परिणाम नजिकच्या शेतीवर झाला आहे.

बेकायदेशीर उत्खनन व त्याचा डेपो केलेल्या ठिकाणांचा पंचनामा करून दंड आकारावा. स्टोन क्रशरला पर्यावरण विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत ते बंद ठेवावे. पुसेगाव ते गोपूज मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर किती ब्रास खडीचा वापर झाला त्याची चौकशी करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. जनता क्रांती दलाच्या या आंदोलनास पुसेसावळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.