गोंदवले बु।। मध्ये महिलांचा ग्रामसभेवर बहिष्कार

शासनाकडून उपाययोजना होत नसल्याचा निषेध

गोंदवले – आंधळी तलाव आटल्याने गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. शासनाकडून मात्र याबाबत उपाययोजना होत नसल्याने महिला ग्रामसभेवर स्थानिक पदाधिकाऱ्यांसह महिलांनी बहिष्कार टाकला. याबाबतची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ टॅंकरना मंजूरी दिली. गोंदवले बुद्रुकला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत आंधळी तलावातून पाणीपुरवठा होतो. परंतु हा तलाव आटल्याने सहा महिन्यांपासून येथे पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून खाजगी विहीर व बोअरचे पाणी एकत्र करून चार-पाच दिवसातून पाणीपुरवठा केला जात आहे.

ज्या भागात पाणी उपलब्ध होऊ शकत नाही, त्या कवटवस्तीला टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्यासाठीचा आर्थिक भार ग्रामपंचायतीच्या आवाक्‍यात नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, शासनाकडे एक विहीर व चार बोअर अधिग्रहण तसेच टॅंकर मिळावेत, अशी मागणी केली होती. परंतु, तहसीलदार माने यांनी स्थळपाहणी करून ग्रामपंचायतीची मागणी चुकीची असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे गोंदवल्यातील पाणीटंचाई समस्या अधिकच जटील बनली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्यक्षात, मात्र गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर महिला ग्रामसभेला जमलेल्या महिला आक्रमक झाल्या. तहसीलदारांनी पाणीटंचाईबाबत दिलेला अहवाल चुकीचा असल्याचे सांगून उपस्थित महिलांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकला. शासनाने गावाला पाण्याची पुरेशी सोयी उपलब्ध करून न दिल्यास प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासह ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. याबाबतची माहिती समजताच प्रशासनाला समजताच तत्काळ पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले. त्यानंतरच आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम व ग्रामसभा पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)