गेली चौदा वर्षे “गैरसोयीं’ची टोल वसुली

लोणी काळभोर– पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते यवत (ता. दौंड) या भागातील रस्त्याचे काम आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) या कंपनीने केले असून, साधारण गेली चौदा वर्षे टोल वसुलीचे काम जोरदारपणे चालू आहे; परंतु प्रवाशांना सोईसुविधा देण्याबाबत कंपनी गंभीरपणे काम करताना दिसत नाही.
आयआरबी कंपनीला कवडीपाट ते यवत या सत्तावीस किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम साधारणपणे 2002 च्या दरम्यान देण्यात आले होते आणि त्यासाठी 88 कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्ण करून 2004 पासून या कंपनीने टोल वसुलीस सुरुवात झाली. कंपनीला टोल वसुली करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. कंपनी कवडीपाट, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर (ता. हवेली) येथे आणि कासुर्डी, यवत (ता. दौंड) येथे टोल वसुली करत आहे; परंतु ज्या गंभीरपणे कंपनी टोल वसुली करते, त्या गंभीरतेने प्रवाशांना सुविधा मात्र उपलब्ध करून देत नाही.

 • महिलांसाठी स्वच्छतागृहच नाही
  कवडीपाट टोलनाक्‍यावरून दररोज हजारो गाड्या ये-जा करतात; परंतु महिलांसाठी एकही स्वच्छतागृह येथे उपलब्ध नाही. पुरुषांसाठी एक आहे; परंतु त्याचे पाणी टोलनाक्‍याशेजारीच रस्त्याच्या कडेला सोडले आहे. स्वच्छतागृहाचे पाणी जाण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्थाही कंपनीने केलेली नाही. कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी टोलनाका, यवत या 27 किलोमीटर अंतरामध्ये एकही स्वच्छतागृह कंपनीने उभारलेले नाही.
 • सर्व्हिस रोडचा वापर एक दिव्यच
  कंपनीने ठिकठिकाणी सर्व्हिस रोड तयार केले आहेत. या रस्त्यांवर व्यावसायिक, नागरिक वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आणून टाकतात. चिकन विक्री करणारे व्यावसायिक रात्री उशिरा अंधार पडल्यावर आपल्या दुकानातील कचरा या रस्त्यावर आणून टाकतात. एमआयटी (राजबाग) मधून लोणी काळभोर गावात येणाऱ्या पुलाखालील सर्व्हिस रोडवर अशा प्रकारचा कचरा पडलेला असतो. या ठिकाणी कायम कुत्री, डुकरे असतात. महामार्गावरील वाहतुकीचा धोका पत्करायला नको म्हणून महिला, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक या रस्त्याचा वापर करतात; परंतु प्रचंड घाण वास व कुत्रे, डुकरांच्या तावडीतून सुटका करून घेऊन तेथून जाणे म्हणजे दिव्यच आहे. या रस्त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी टोल कंपनीकडे आहे; परंतु कंपनीवर्षातून एकदा या रस्त्याची जेसीबी मशीन लावून स्वच्छता करते.

कदमवस्ती समोर हिंदूस्तान पेट्रोलियम कंपनीचे एक फाटक आहे. या फाटका समोरील सर्व्हिस रोडवर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी कंपनीत जाणारे व कंपनीतून भरून आलेले टॅकर उभे असतात. तेथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे एक रोहित्र ( डी. पी. ) आहे. या डीपी जवळ खूप मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असतो. अधून मधून या कचऱ्याला कुणीतरी काडी लावते. आणि मग दिवसभर हा कचरा पेटत राहतो. या आगीमुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता आहे. हिंदूस्तान पेट्रोलियम कंपनीचे आधिकारी किंवा टोल कंपनीचे आधिकारी कुणीच या संभाव्य आगीकडे लक्ष देत नाही. परंतू येथे जर आग लागली तर फार मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

 • अग्निशमन यंत्रणा नाही
  काही दिवसांपुर्वी पहाटेच्या वेळी टोलनाक्‍यावर एका मालट्रकला अपघात होऊन, ट्रक जळून खाक झाला. परंतु टोलटोलनाकवर अग्निशामक यंत्रणा उपलब्ध असती तर हि आग तातडीने विझवता आली असती. गेल्या वर्षी उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महामार्गावरील दोन फर्निचरच्या दुकानांना मध्यरात्री आग लागून कोट्यवधींचे फर्निचर जळाले. चार वर्षापुर्वी पहाटेच्या वेळी कुंजीरवाडी गावाच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर अपघात होऊन एका ट्रकमधील चालक व अजून एक जण जागीच जळून खाक झाले होते. या नंतरही टोल कंपनीने अग्निशामक यंत्रणा उभारली नाही.
 • महामार्ग नवीन होता, तेव्हा रस्त्यामधील दुभाजकावर हिरव्या रंगाचे, टोल कंपनीचे नाव टाकलेले छोटे फलक उभारण्यात आले होते. यामुळे रात्रीच्या वेळी समोरील वाहनाच्या हेड लाईटचा प्रकाश वाहन चालकाच्या डोळ्यावर येत नसे. आता ते तुटले आहेत, त्यामुळे होणाऱ्या छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
 • दुय्यम दर्जाचे सीसीटीव्ही
  एखादा अपघात झाल्यास अपघात करून गेलेले वाहन पकडण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजची गरज असते. मात्र या टोलनाक्‍यावरील सीसीटीव्ही कॅमेरे दुय्यम दर्जाचे असल्याने येथील फुटेज व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे वाहन दिसते; परंतु वाहनाचा क्रमांक किंवा चालकाचा चेहरा ओळखू येत नाही. त्यामुळे पोलिसांना अपघात करून गेलेले वाहन पकडणे शक्‍य होत नाही. या संदर्भात लोणी काळभोर पोलिसांनी टोलनाका व्यवस्थापनाला लेखी सूचना केली आहे; परंतु अजूनही या संदर्भात काहीही प्रगती झाली नाही.
 • ऍम्ब्युलन्सची सोय नाही
  बहुतेक टोल कंपन्या आपल्या टोलनाक्‍याच्या हद्दीत एखादा अपघात झाला तर जखमींना तातडीची मदत मिळावी म्हणुन एखादी ऍम्ब्यूलन्स तयार ठेवतात. या कंपनीने ठेवलेली ऍम्ब्युलन्स आजपर्यंत कधीच कुणी पाहिलेली नाही. या सत्तावीस किलोमीटरच्या अंतरात कंपनीने फक्त लोणी काळभोर फाटा व थेऊर फाटा या दोनच ठिकाणी दिवे बसविले आहेत. इतर ठिकाणी खाजगी व्यक्ती, औद्योगिक कंपन्या, शैक्षणिक संस्था, स्थानिक ग्रामपंचायती यांनी मोठे मोठे दिवे बसवून दिले आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)