गेंडामाळ नाक्‍यावरील चालण्याच्या ट्रॅकची दुरवस्था

सातारा – गेंडामाळ नाक्‍यावरील अर्धविकसित हुतात्मा उद्यानात सुमारे अर्धा कोट रुपये खर्च करून बांधलेल्या “सिंथेटिक ट्रॅक’वर पुरेशा देखभालीअभावी पाणी फिरले. या ट्रॅकची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पालिकेने एवढ्या महागाईचा ट्रॅक केला; परंतु सांभाळता नीट येत नसेल तर त्याचा घाट घातला कशाला, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

पालिकेच्या हद्दीवर असलेल्या गेंडामाळ नाक्‍यावर सुमारे साडेपाच एकर जागा पडून आहे. पालिकेचे हे नियोजित हुतात्मा उद्यान अर्धविकसित अवस्थेत आहे. गेली अनेक वर्षे हा भूखंड नुसता पडून होता. पालिकेने जानेवारी 2014 मध्ये सुमारे 50 लाख रुपये खर्च करून एक पेव्हरचा व दुसरा सिंथेटिक ट्रॅक बांधला. या ट्रॅकची लांबी 350 मीटर्स आहे. रोज सकाळ-सायंकाळी परिसरातील नागरिक या ट्रॅकवर अनवाणी फिरायला जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उद्यानाची पुरेशी देखभाल घेतली गेली नाही. त्यामुळे अगदी पहिल्या पावसाळ्यापासून ट्रॅकवर पाणी साचत गेले. सिंथेटिक ट्रॅकचे तीन ठिकाणी नुकसान झाले. पहिल्या पावसाचा अनुभव लक्षात घेऊन ट्रॅकच्या सखल भागात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची कोणतीही व्यवस्था पालिकेने केली नाही. त्यामुळे दीर्घकाळ पाणी साचल्याने ट्रॅकवरील बारीक सिंथेटिक कण निघून जाऊ गेले. या ट्रॅकला तीन वर्षांची वॉरंटी होती. या वॉरंटीच्या कालावधीतही त्याकडे दुर्लक्षच झाले.

त्यामुळे ट्रॅकचे नुकसान वाढत गेले. ट्रॅकवर काही ठिकाणची वाळू पूर्णता निघून गेली असून काही भागात गवत वाढले आहे. सखल भागामध्ये ट्रॅकवर पाणी साचत आहे. त्यामुळे ट्रॅकचे आणखी नुकसान संभवते. जिल्ह्यात कोठेही नाही, असा सिंथेटिक ट्रॅक पालिकेने सार्वजनिक उद्यानात केला खरा, परंतु त्यांना पुरेशी काळजी घेता आली नाही. त्याऐवजी संपूर्ण ट्रॅकच पेव्हरचा केला असता तर वाचलेला निधी उद्यानाच्या इतर सुविधांवर खर्च करता आला असता, अशा प्रतिक्रिया या उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)