गॅस सबसिडीसाठी आधार लिंकचा 2 वर्षांपासून खोडा

गॅस सबसिडी बॅंक खात्यात जमा होत नसल्याने लाभार्थ्यांतून होतोय संताप व्यक्‍त

जामखेड – बॅंक खात्याशी आधार कार्ड जोडलेले असतानादेखील मागील दोन वर्षांपासून आधार लिंक होत नसल्यामुळे, जामखेड शहरासह तालुक्‍यातील हजारो लाभार्थींची गॅस सिलिंडरची सबसिडी खात्यात जमा झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हक्काचा पैसा मिळत नसल्यामुळे लाभार्थींमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या गंभीर बाबीकडे पुरवठा विभागाने जातीने लक्ष देऊन लाभार्थींच्या खात्यात सबसिडी जमा करण्यात यावी, अशी मागणी लाभार्थी करत आहेत.

गॅस धारकांना शासकीय दरानुसार सिलिंडर मिळत होते. त्यावेळी तीनशे ते चारशेच्या जवळपास एका सिलिंडरची किंमत होती. परंतु घरगुती गॅससह व्यावसायिक गॅसच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, लाभार्थींच्या खात्यात सबसिडी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरासह तालुक्‍यातील हजारो लाभार्थींनी बॅंक खाते काढून त्याला आधार लिंक केले आहे. सिलिंडरसाठी देण्यात आलेल्या रकमेतून काही लाभार्थींना सबसिडीच्या नावाने शंभर रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येत आहे.

या सबसिडीची रक्कम लाभार्थींनी आधार लिंक केलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या खात्यात जमा होत होती. मात्र मागील दोन वर्षांपासून असंख्य लाभार्थींच्या खात्यात हक्काची सबसिडी जमा झाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे लाभार्थींच्या हक्काच्या पैशापासून वंचित राहावे लागत आहे. वास्तविक पाहता लाकूडतोड कमी होऊन जंगलाचे रक्षण व्हावे, यासाठी लाभार्थींना अनुदानातून गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले होते. थेट लाभांतर्गत गॅस सिलिंडरची सबसिडीही खात्यात जमा होण्यासाठी लाभार्थींचे आधार लिंक होणेही गरजेचे असल्याने लाभार्थींना बॅंक खात्याशी आधार लिंक सुद्धा केले. परंतु मागील दोन वर्षांपासून गॅस सिलिंडरची सबसिडी खात्यात जमा होत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत.

याबाबत संबंधित गॅस एजन्सीकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्‍न लाभार्थींना पडला आहे. या गंभीर बाबीकडे पुरवठा अधिकाऱ्याने लक्ष देऊन रखडलेली सबसिडीसह व्याजाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश एजन्सी धारकास द्यावे, अशी मागणी गॅस ग्राहकांतून होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)