गॅस वितरक, पोलिसांच्या वादात

  • नागरिकांची उपासमार 
  • सांगवी पोलिसांनी थांबवले गॅस वितरण
  • गर्दी जास्त होत असल्याने कारवाई

पिंपरी – सध्या घरगुती गॅस सिलेंडर वितरकांनी घरपोच सेवा बंद केली आहे. यामुळे नागरिकांना गॅस सिलेंडर घेऊन थेट वितरकांच्या कार्यालयापर्यंत जावे लागत आहे. दुसरीकडे “करोना’मुळे संचारबंदी आणि जमावबंदी कायदा लागू असल्याने पोलीस गर्दी कमी करण्याचे प्रयत्न करत आहेत. या दोन परस्परविरोधी परिस्थितीत नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. असाच प्रकार आज सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव येथे घडला. एका गॅस वितरक कार्यालयासमोर लांबच लांब रांग लागली होती. सांगवी पोलिसांनी ही गर्दी कमी करण्यासाठी थेट गॅस वितरणच थांबवून नागरिकांचे हाल वाढविले.

गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरची होम डिलिव्हरी वितरकांकडून बंद करण्यात आली आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी बुक केलेले सिलेंडर नागरिकांना अद्याप मिळालेले नाही. कित्येक नागरिकांकडे केवळ एकच सिलेंडर आहे, काहींचे सिलेंडर संपले आहे तर काहींचे केव्हाही संपू शकते. सध्या हॉटेल, रेस्टॉरेंट आणि खानावळी देखील बंद आहेत. अशा परिस्थितीत खायचे काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यामुळे नागरिकांची गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी धडपड सुरु आहे.

गुरुवारी सकाळपासूनच पिंपळे गुरव येथे गॅस सिलेंडर घेऊन नागरिक आले होते. नागरिकांची भली मोठी रांग येथे लागली होती. दरम्यान प्रत्येकालाच आपल्या जिवाची आणि आपल्या कुटुंबाची काळजी असल्याने प्रत्येक नागरिक दुसऱ्या नागरिकापासून विशिष्ट अंतर राखून रांगेत उभा होता. यामुळे रांग बरीच लांब झाली. दुपारी बाराच्या सुमारास कडक उन्हामुळे नागरिक सावली शोधू लागले आणि याचवेळी पोलिसांचे आगमन झाले.

दरम्यान पोलिसांनी गॅस वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या आणि गॅस वितरकासोबत फोनवर संपर्क साधला. पोलिसाची अपेक्षा होती की गर्दी कमी व्हावी, परंतु गॅस नेला नाही तर स्वयंपाक कसा बनणार, लहान मुलांसाठी दूध गरम कसे करणार याची नागरिकांना चिंता होती. म्हणून नागरिक रिकाम्या हाताने जाण्यास तयार नव्हते. दरम्यान वितरक आणि पोलीस यांच्यामध्ये फोनवर वादा-वादी झाली आणि पोलिसांनी वितरण थांबविले.

नागरिक विनंती करत होते की एकच सिलेंडर आहे, घरी लहान मुले आहेत परंतु पोलीस ऐकण्यास तयार नव्हते. पोलिसांनी आपल्या स्टाइलमध्ये खडसावल्यावर नागरिकांना येथून निराश होऊन परतावे लागले. येथे उपस्थित नागरिकांनी सांगितले की, आठ ते दहा दिवसांपूर्वी बुकींग केले होते, परंतु अद्यापही सिलेंडर मिळालेले नाही. आज सिलेंडर मिळण्याची अपेक्षा होती, परंतु पोलिसांनी हुसकावून लावले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.