गुलाब पुष्प उद्यानाची रया गेली

समस्यांचे उद्यान – भाग 2

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे कार्यालयच असलेल्या यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प उद्यानाची रया गेली आहे. त्याचा वापर चक्क क्रिकेट खेळण्याकरीता केला जात असून मोकाट कुत्र्यांनी याठिकाणी ठिय्या मांडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या जुन्या उद्यानांपैकी गुलाबपुष्प उद्यान हे एक आहे. अनेक जातींची गुलाब रोपे याठिकाणी पहायला मिळतात. पूर्वी शहरात उद्यानांची सैर करायची म्हटल्यास आवर्जून या उद्यानात नागरिक यायचे. मात्र, मागील काही वर्षात उद्यानाचा तजेला कुठेतरी हरपला आहे. उद्यानासाठी दोन सुरक्षा रक्षक असून 4 महिला कर्मचारी व 8 पुरुष उद्यानाची स्वच्छता व देखभाल करण्याकरीता आहेत. मात्र उद्यानात म्हणावी तशी स्वच्छता नाही. शेजारीच महापालिकेचा मोकाट जनावरांचा कोंडवाडा आहे. याठिकाणाहून कुत्र्यांचे कळप या उद्यानात पहुडलेले असतात. उद्यानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. फिरायला आलेल्या नागरिकांना पाणी पिण्याकरीता उद्यानाच्या मुख्यद्वारा जवळ जाऊन कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या टाकीतले पाणी प्यावे लागते.

उद्यानातील पदपथावरील फरशा निखळल्या असून काही फरशा फुटल्या आहेत. त्यामुळे उद्यानात येणारे ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांना ठेचकळावे लागते. उद्यानातील खुर्च्या अस्वच्छ असून त्यांची संख्या कमी आहे. उद्यानाचे आकर्षण असलेल्या कारंजाचे अवशेष शिल्लक राहिले आहेत. प्रेमीयुगुलांचा उद्यानात वावर वाढला आहे. त्यांच्या चाळ्यांमुळे सर्वसामान्य याठिकाणी यायला कचरतात. उद्यानात मैलाशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुर्नवापर केला जातो. हे पाणी मुबलक प्रमाणावर असतानाही झाडांना पाणी देण्यात कर्मचारी हलगर्जीपणा करत असल्याने काही झाडे कोमेजून गेली आहेत. मोजक्‍याच कचरापेट्या असल्याने नागरिक उद्यानातच कचरा फेकतात. वेळोवेळी स्वच्छता गृहाची स्वच्छता होत नाही.

उद्यानातील प्रमुख समस्या
– पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही
– उद्यान परिसराची वेळोवेळी स्वच्छता होत नाही
– कारंजे नादुरुस्त झाले असून ते बंदच आहे
– उद्यानात क्रिकेट खेळणाऱ्यांचा नागरिकांना नाहक त्रास
– मुबलक पाण्याअभावी झाडे कोमेजली
– चाळे करत बसणाऱ्या प्रेमी युगुलांकडे दुर्लक्ष
– पुरेशा कचरापेट्यांचा अभाव
– पावसाळा तोंडावर येवूनही झाडांच्या छाटणीकडे दुर्लक्ष

उद्यानात आल्यावर शांती मिळावी अशी अपेक्षा असते. मात्र येथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा जोरजोरात गोंगाट सुरु असतो. अनेकांना बॉल लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नाहक वादाचे प्रसंग उद्‌भवतात. उद्यान विभागाचे कार्यालय येथे असूनही या उद्यानाकडे झालेले दुर्लक्ष आश्‍चर्यकारक आहे.
– संतोष भारद्वाज, नागरिक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)