गुरूवार ठरला पोलिसांसाठी अपघातवार

साताऱ्यात महिला हवालदार घार्गे जखमी; खेड शिवापुरजवळ राजेंद्र साळुंखेंसह चालक जखमी

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी)

गुरुवार हा दिवस सातारा पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना अपघातवार ठरला. गुरूवारी सकाळी साताऱ्यात झालेल्या अपघातात महिला हवालदार जखमी झाल्या होत्या. तर गुरूवारी रात्री साडे अकराच्यास सुमारास खेड शिवापूरजवळ झालेल्या अपघातात पोलीस उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांच्यासह त्यांचा चालक जखमी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा पोलीस मुख्यालयात उपाधीक्षक (गृह) असलेले राजेंद्र साळुंखे हे गुरूवारी कामानिमीत्त पुण्याला गेले होते. सायंकाळी काम आटोपुन ते साताऱ्याला येत असताना खेड शिवापूर टोल नाक्‍याजवळ त्यांच्या गाडीला खड्ड्यामुळे अपघात झाला.

या अपघातात साळुंखे यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असून बारा टाके पडले आहेत. तर त्यांचे चालक बोराटे हे किरकोळ जखमी झाले आहेत. साळुंखे यांच्यावर पुण्यातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.

तर दुसऱ्या घटनेत सातारा जिल्हा न्यायालयात नोकरीस असलेल्या महिला हवालदार उमा घार्गे या सकाळी साडे दहाच्या सुमारास न्यायालयात कर्तव्यावर निघाल्या होत्या.

त्यावेळी एलआयसी’च्या इमारतीजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत घार्गे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर साताऱ्यातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×