गुरु शिष्य परंपरा… (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)

आज गुरुपौर्णिमा. तसं बघायला गेलं तर हा काही सण नाही पण या दिवसाचं एक वेगळं महत्व आपल्या संस्कृती मध्ये आहे. गुरू ही संकल्पना आपल्या संस्कृतीमध्ये खूपच उच्च दर्जाची आहे. गुरुचं महत्व हे देवापेक्षा यत्किंचितही कमी नाही. वेदांमध्ये गुरूचा उल्लेख हा साक्षात परब्रम्ह म्हणून केला गेला आहे. या संकल्पनेला साजेशीच गुरुची परंपरा आपल्याला दिसून येईल. आणि ही परंपरा खूप प्राचीन अशी आहे. म्हणजे अगदी रामायणापूर्वीच्या काळापासून ते आजपर्यंत.

 गुरुची परंपरा सुरू राहण्यासाठी आवश्यक असतो तो शिष्य. हा शिष्य ही परंपरा फक्त पुढे नेत नाही तर ती अधिकाधिक समृद्ध करत जातो. याचीच असंख्य उदाहरणं आपल्याला जगभर दिसतील. गुरू शिष्याच्या अशाच काही जोड्या जर आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी एका विशिष्ट क्षेत्रात महान असं कार्य केलंय. त्या विषयाला एक आगळं वेगळं वलय या गुरुशिष्यामुळे प्राप्त झाल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. वानगीदाखल जर सांगायचं झालं तर नारदमुनी आणि वाल्मिकी ऋषी. रूढार्थाने हे काही गुरू शिष्य नाहीत. पण नारद मुनींनी पूर्वाश्रमीच्या वाल्या कोळ्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांचं परिवर्तन एका महान ऋषींमध्ये झालं आणि त्यांच्या हातून एक असं महाकाव्य प्रसवलं की काही हजार वर्षांपासून अनेक विद्वान लोकांना हे महाकाव्य अभ्यासावस वाटतं. किती अद्भुत आहे हे. कल्पनेत देखील जे अशक्य वाटतं ते नारदमुनी प्रत्यक्षात करून दाखवतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर येतो महाभारताचा काळ. यातील एक प्रसिद्ध जोडी म्हणजे अर्जुन-द्रोणाचार्य. द्रोणाचार्य हे तसं बघायला गेलं तर कौरव आणि पांडव दोघांचेही गुरू. पण अर्जुनातील काही विशेष गुण या गुरूने ओळखले आणि श्रेष्ठतम धनुर्धर म्हणून अर्जुन अमर झाला. याच गुरूंचा अजून एक शिष्य म्हणजे एकलव्य. एकलव्याने शिष्याच्या परंपरेत एक अनोखं उदाहरण प्रस्थपित केलं. प्रत्यक्ष द्रोणाचारयांच्या हातून दिक्षा त्याला मिळाली नव्हती पण तरीदेखील त्यांनाच गुरू मानून त्याने जे कौशल्य विकसित केलं त्याला बघून द्रोणाचार्य देखील अचंबित झाले होते. इतिहासातील हे एकमेव उदाहरण. अशी उदाहरणं जगाच्या पाठीवर सापडतच नाहीत..विरळादेखील.

त्यानंतर जर आपण अजून अलीकडे आलो तर आपल्याला दिसतात मिलिंद-नागसेन.प्रचंड ज्ञानलालसा असलेला शिष्य प्रश्न विचारून आपल्या गुरूला बोलत करतो आणि त्यांची प्रश्नोत्तरे बुद्ध विचारसरणीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. जगातील अनेक तत्वज्ञ, विचारवंत या प्रश्नोत्तरांचा आजही अभ्यास करतात. समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी हे गुरू शिष्य देखील याच परंपरेतील. एका गावातील मुक्कामात असताना समर्थ रामदासांनी कल्याण स्वामींच्या आईला त्यांचा हा मुलगा शब्दशः भिक्षा म्हणून मागितला. पुढे चालून कल्याण स्वामी हे त्यांचे अत्यंत लाडके शिष्य झाले. रामदासी स्वामींचे विचार त्यांनी महाराष्ट्रातील तरुणांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोचवले.हा झाला इतिहासाचा भाग पण अगदी नजीकच्या काळात देखील याच तोडीची एक जोडी होऊन गेली. आणि या जोडीतील शिष्याने जगाला प्रभावित केले.

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस हे ते महान गुरू शिष्य. नरेंद्र नावाचा एक साधारण वयाचा मुलगा परिस्थितीमुळे हतबल होऊन परमहंसाकडे आला एक त्यानंतर एक असा इतिहास घडला की जो आजही जगाच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतो आहे. विवेकानंदांचं कार्य इतकं विलक्षण आहे की फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांनी आपल्या वाणीने, विचाराने आणि कृतीने एक चेतना निर्माण केली. हेच विवेकानंद कधी काळी पूर्णपणे निराश झाले होते यावर विश्वास ठेवणं अवघड आहे.

एक गुरू काय चमत्कार घडवू शकतो याच यापेक्षा बोलकं उदाहरण असूच शकत नाही. अगदी अलीकडच्या काळातील बोलायचं झालं तर एक प्रसिद्ध जोडी म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्याचे गुरू श्री रमाकांत आचरेकर. दोघेही अत्यंत साधे. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार इतक्या लहान वयात पटकवणारा सचिन आपल्या सर्वांचा लाडका. सचिन हा क्रिकेटमधील जणू एक दंतकथा बनून गेला आहे. पण त्याचं हे कौशल्य अगदी लहान वयात आचरेकर सरांनी ओळखलं. त्यांच्याकडे आलेल्या या हिऱ्याला त्यांनी इतक्या कठोरतेने पैलू पाडले की त्या हिऱ्याचा नावलौकिक कधीच कमी होणार नाही. इतकं प्रचंड यश मिळूनही दोघांचेही पाय जमिनीवर आहेत. त्यांच क्रिकेटवरील प्रेम आजही कमी झालेलं नाही. आधुनिक काळातील अर्जुन-द्रोणाचार्य म्हणजे सचिन-आचरेकर.

आजच्या दिवशी या गुरू शिष्यानी केलेलं हे कार्य आपल्याला नक्कीच प्रेरणा देणार आहे. या नात्याची भुरळ लेखक लेखिकांना पडली नसती तरच नवल. आपल्या कादंबऱ्या मधून गुरू शिष्याची जोडी अजरामर केली ती जे के रोलिंग या लेखिकेने. तिच्या जगभर गाजलेल्या हॅरी पॉटर या व्यक्तिरेखेच्या जडण घडणीत अत्यंत महत्वाची असणारी व्यक्ती म्हणजे प्राध्यापक डंबलडोर. तान्हा असतानाच आई वडिलांचं छत्र हरवलेला हा गोड पोरगा. डंबलडोर त्याला आपल्या जादुई दुनियेत घेऊन येतात आणि त्यानंतर हॅरी पॉटर ज्या काही करामती करतो तो एक अद्भुत इतिहास आहे.

या आणि अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी हे जग घडवलं, समृद्ध केलं. ज्ञान निर्माण केलं. ते टिकवलं आणि वाढवलं देखील. जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस, त्याचा शिष्य अरीस्टेटल आणि त्याचाही शिष्य प्लेटो यांनी जगाला जे तत्वज्ञान दिलं त्याला तोड नाही. अगदी विज्ञानाच्या क्षेत्रात देखील गुरू शिष्य आहेतच. मेघनाद साहा आणि विक्रम साराभाई यांनी भारताच्या अंतराळ संशोधनात जे मौलिक कार्य केलं त्यांच्या आधारावरच आजची इसरो अनेक शिखरं पादाक्रांत करत आहे. या आणि अशा अनेक गुरू शिष्यांचे जगावर खूप उपकार आहेत. आजच्या दिवशी आपण या सर्वांचे आपण आभार मानू. या परंपरेचा आपण देखील एक भाग आहोत ही खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे हे विसरता कामा नये. अशा या पवित्र दिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा.

  – अमोल कुलकर्णी, औरंगाबाद 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)