“गुरुविण कोण दाखविल वाट?’…(प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)

गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु:, गुरुर्देवो महेश्‍वर: 
गुरुर्साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ।।

वरील श्‍लोकापासून आपणास गुरुमहतीचा बोध होतो. आपल्या भारतीय संस्कृतीत मात- पित्या इतकेच आपण गुरुला मानतो. म्हणूनच मातृदेवोभव, पितृदेवोभव व आचार्य देवोभव असेही म्हणतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक माणसाचा पहिला गुरु आई असते. आई नंतर प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आपणास गुरुकडून मिळते. आपली गुरुवर श्रद्धा असते. संकटकाळी गुरुंचे मनापासून स्मरण केले तर गुरु आपणास संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे गुरु हे माध्यम आहे म्हणून गुरुंकडे भौतिक सुख न मागता आत्मोन्नती, परमात्मभेटीची मागणी करावी. शिष्याच्या मनात अस्वस्थता असेल तर त्याची जाणीव गुरुंना होत असते.

लहान रोपटे खतपाणी घालून काळजीपूर्वक नीट सांभाळले तर ते मोठे झाल्यावर अनेकांना सावली देते, आश्रय देते, फळे, फुले देते. तसेच लहान मुलांवर गुरुकडून चांगले संस्कार झाले तर तो उत्तम नागरिक तयार होईल. गुरु चमत्कार करीत नाहीत तर योगसाधना, तपस्या, ज्ञानार्जन यामुळे ते वंदनिय होतात.
देव आणि संत यांनीही गुरु केले होते. संत रामदासांनी प्रत्यक्ष रामालाच गुरु मानले होते. परमात्मा परमेश्वर प्रत्यक्ष श्रीकृष्ण व श्रीराम यांनीही गुरुगृही जाऊन ज्ञानार्जन केले होते तर छोटीसी मुक्ताई हिला नामदेवांनी गुरु मानले होते. वारकरी सांप्रदायात तर श्रेष्ठ-कनिष्ठ, श्रीमंत-गरिब, लहान-थोर हा भेद मानत नाहीत. म्हणून तर पंढरीचा वारकरी एकमेकांना भेटल्यावर एकमेकांच्या पाया पडतात.

सध्याच्या काळात गुरुची अत्यंत गरज आहे. कारण भौतिक गोष्टीसाठी माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. त्यासाठी सु-विचार, सुसंस्कार यांची गरज आहे आणि हे सर्व आपणास गुरुकडूनच मिळतील म्हणून आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला म्हणावेसे वाटते- “गुरुविण कोण दाखविल वाट?’

– श्रीमती मालती माधव कुलकर्णी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)