गुरुपौर्णिमेला गोंदवलेत भक्तीचा महापूर

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लागलेली रांग. (छाया : संदीप जठार)

हजारो भाविकांनी घेतले गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन

गोंदवले, दि. 27 (प्रतिनिधी) – रिमझीम बरसत्या धारा.. मनी गुरुमाऊलीच्या भेटीची आस अन्‌ मुखी श्रीरामाचा जयघोष अशा मंगलमय वातावरणात शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीमुळे गोंदवल्यात भक्तीचा महापुर आला होता.
श्रींच्या समाधी मंदीरात दर पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त समाधी मंदीरात विविध कार्यक्रम सुरु होते. परतणारी आषाढी वारी यामुळे काल दुपार पासुनच भाविकांनी समाधी मंदीरात हजेरी लाण्यास सुरुवात केली होती. रात्रीपर्यंत समाधी मंदीर परिसर भाविकांनी फुलुन गेला होता.
मध्यरात्रीपासूनच दर्शनबारीतही भाविकांनी उपस्थिती लावली होती. सकाळी दहाच्या सुमारास दर्शनाच्या रांगा सुमारे दोन किलोमिटर अंतरापर्यंत गेल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत या रांगा दिसतच होत्या. सकाळपासूनच रिमझीम पावसाने सुरुवात केली. मात्र, अशाही वातावरणात भक्तीचा महापुर ओसंडून वाहत होता. गुरुपौर्णिमा उत्सवाला गेल्या शुक्रवारी (दि. 20) पासून सुरुवात झाली. त्यानंतर अखंड पहारा, नामस्मरण, भजन, श्रीलिलामृत पारायण, विष्णुसहस्त्रनाम आदी विविध धार्मिक कार्यक्रम सुरु होते. याशिवाय ह.भ.प. श्री यांचे कीर्तन झाले. आज पहाटे काकड आरतीने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी मुख्य समाधी मंदिरात अनेक भाविक श्रींचा अनुग्रह घेत होते. अभिषेकासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्य सभामंडपात विविध मान्यवरांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी नऊच्या सुमारास गावातून रामदासी भिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर समाधी मंदिरात भाविकांची गर्दी दिसत होती. त्याबरोबरच गावातील विविध मंदिरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांच्या सोयीसाठी दहिवडी, फलटण, बारामती, सातारा, कराड आदी ठिकाणाहून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.
दरम्यान, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेवून दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रवीण पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)