गुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द

गुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत स्थानबध्द
पुणे,दि.22- गुन्हयांचे अर्धशतक पार केलेला सराईत गुन्हेगार फिरोज मकबूल खान उर्फ बबाली(46,रा.भवानी पेठ) यास एमपीडीए कायद्यान्वये येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
फिरोज खान याच्याविरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न, रॉबरी, दुखापती सारखे गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्हेगाराने त्याच्या गुन्हयांचे अर्धशतक पार केले असून त्याच्या विरुध्द तब्बल 57 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी समर्थ पोलिसांनी त्याच्या विरोधात 110 प्रमाणे चॅप्टर केस, तडीपारी कारवाई, एमपीडीएअंतर्गत एक वर्षाकरीता स्थानबध्दतेची कारवाई करुनही त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमध्ये काहीएक फरक पडला नव्हता. तो येरवडा कारागृहातून एक वर्षाच्या स्थानबध्दतेचा कालावधी भोगून एप्रिल 2019 मध्ये बाहेर पडला होता. कारागृहातून बाहेर पडल्यावर त्याने पुन्हा गुन्हे करणे सुरु केले होते. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे नागरिकांची मालमत्ता आणी जीवीतास धोक निर्माण झाला होता. यामुळे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी त्यास परत एकदा एक वर्षाकरीता एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष थोरात व पोलीस नाईक अजित शिंदे यांनी गुन्हे अभिलेख व इतर महत्वाची माहिती उपलब्ध करुन दिली. पोलीस आयुक्तांनी स्थानबध्दतेचा आदेश काढताच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे , पोलीस नाईक अजित शिंदे, पोलीस हवालदार संतोष थोरात, अनिल शिंदे, पोलीस शिपाई निलेश साबळे, सुमीत खुट्टे यांनी त्याला निशांत थिएटर परिसरातून ताब्यात घेतले. त्याला येरवडा करागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.