गुटखा वाहतूक करणारी लक्‍झरी बस पकडली

शिक्रापूर पोलिसांची कारवाई : बससह पावणेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे- नगर रस्त्यावरून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका लक्‍झरी बसला ताब्यात घेत त्यातील मुद्देमालासह ही बस शिक्रापूर पोलिसांनी जप्त करत अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देत तिघांवर गुन्हे दाखल केले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र देवीदासराव पाटील (रा. बाणेर रोड, औंध, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. बसचालक बलविंदरसिंग कुलवंत सिंग (वय 55, रा. बुरवाई गेट सिंधियनगर मध्यप्रदेश) त्याचे दोन साथीदार वासिम अजीज खान (वय 36, रा. बडवा, जि.खरगोंद, मध्यप्रदेश) व शैलेश रामलाल मालविया (वय 22, रा. गंधवाणी जि. धार), अशी गुन्हे दाखल केलेल्यांची नावे आहेत.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- नगर रस्त्यावरून एक लक्‍झरी बसमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे पोलीस नाईक योगेश पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस नाईक योगेश पाटील, निखील रावडे, होमगार्ड सतीश गव्हाणे यांनी पुणे- नगर रस्त्यावरील कल्याणी फाटा येथे सापळा लावला. त्यांना त्या ठिकाणी (एमपी 09- एफए 8351) लक्‍झरीबस आल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी त्या बसला अडवून बसची पाहणी केली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी बस व चालकासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र पाटील हे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आले. त्यांनतर त्यांनी पाहणी करीत गुटख्याची वाहतूक करणाऱ्या लक्‍झरी बससह त्यातील गुटखा, असा सुमारे सात लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • परिसरातील गुटख्यांच्या वाहनांवर कारवाई नाही?
    शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाबळ, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, कोरेगाव भीमा यांसह आदी भागांमध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा गुटख्याचे मोठमोठे टेम्पो येऊन त्या गुटख्याची राजरोसपणे विक्री होत असते. परंतु शिक्रापूर पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणत्याही गुटख्याच्या वाहनांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे परिसरात गुटखा विक्री करणाऱ्या वाहनांची माहिती पोलिसांना नाही का, परिसरामध्ये गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाई का करत नाहीत, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.