गिरीश एर्नाककडे पुणेरी पलटण संघाचे नेतृत्व ; अशन कुमार यांची संघाच्या प्रशिक्षकपदी निवड 

पुणे: प्रो-कबड्डी लीग स्पर्धेच्या सहाव्या हंगामासाठी पुणेरी पलटण संघाने आज नवीन कर्णधाराची घोषणा केली. गिरीश एर्नाककडे यंदाच्या मोसमात पुणेरी पलटण संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पाचव्या हंगामात डाव्या कोपऱ्यावर बचावपटू म्हणून खेळताना गिरीशने सर्वोत्तम कामगिरी केली होती. यानंतर दुबईत झालेली कबड्डी मास्टर्स स्पर्धा आणि आशियाई क्रीडास्पर्धेतही गिरीश भारतीय संघाचा सदस्य होता.
प्रो-कबड्डी लीगचे पहिले दोन हंगाम गिरीश पाटणा पायरेट्‌स संघाकडून खेळला, यानंतर पुढचे दोन हंगाम गिरीशला बंगाल वॉरियर्स संघाने आपल्या संघात सामावून घेतले. यानंतर पाचव्या हंगामात पुणेरी पलटणने गिरीशला आपल्या संघात समाविष्ट केले. पाचव्या हंगामात गिरीश एर्नाकने डाव्या कोपऱ्यावर काही चांगल्या पकडी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. पुणेरी पलटण संघाच्या ट्‌विटर अकाऊंटवर गिरीशच्या नियुक्‍तीची घोषणा करण्यात आली आहे.
पहिल्या दोन हंगामांमध्ये पुणेरी पलटण संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र तिसऱ्या हंगामापासून पुण्याच्या संघाने चांगली कामगिरी नोंदविली. पाचव्या हंगामामध्येही पुणेरी पलटणने अव्वल चार संघांच्या गटात प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरी गाठण्यात त्यांना अपयश आले होते, त्यामुळे यंदाच्या हंगामात गिरीश एर्नाकच्या नेतृत्वाखाली पुणेरी पलटणचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
त्याचबरोबर पुणेरी पलटण संघाच्या प्रशिक्षकांमध्ये यंदाच्या हंगामासाठी पुन्हा बदल करण्यात आला असून यंदा ही जबाबदारी अशन कुमार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अशन कुमार यांनी पुणेरी पलटण संघाच्या तयारीबद्दल आत्मविश्‍वास व्यक्‍त केला आणि गेल्या मोसमातील चुका टाळण्यासाठी कसून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. नवनियुक्‍त कर्णधार गिरीश एर्नाकनेही नेतृत्वाच्या जबाबदारीची जाणीव असल्याचे सांगतानाच नव्या मोसमातील कामगिरीबद्दल आत्मविश्‍वास व्यक्‍त केला.
या वेळी पुणेरी पलटण संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. पुणेरी पलटण संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपाल, मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न फिरोदिया किर्लोस्कर ब्रदर्सचे बिझनेस हेड अनुराग व्होरा आणि झिओमी इंडियाचे विपणन प्रमुख करण श्रॉफ उपस्थित होते. प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या मोसमाला 7 ऑक्‍टोबर रोजी प्रारंभ होत असून पहिली फेरी चेन्नईत यू-मुंबाविरुद्ध होणार आहे. पुणेरी पलटण संघाची पुण्यातील फेरी 18 ते 24 ऑक्‍टोबर दरम्यान रंगणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)