गावठी पिस्तूलासह फरारी आरोपी गजाआड

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची चांबळीत कारवाई

लोणी काळभोर- आगामी लोकसभा निवडणुक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली असून चांबळी ( ता. पुरंदर ) येथून एका फरारी आरोपीला गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुसासह जेरबंद केले आहे. याप्रकरणी श्रीनाथ अशोक बडदे (वय 21, रा. कोडीत, ता. पुरंदर) याला अटक करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलीसांनी प्राधान्य दिले आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रेकॉर्डवरील फरारी आरोपींना जेरबंद करणे व अवैध हत्यारांचा शोध घेऊन ती ताब्यात घेणे, यासाठी एका पोलीस पथकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पथकात सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, अर्जुन मोहिते, सहायक फौजदार डी. जी. जगताप, विजय कांचन, धीरज जाधव, मंगेश भगत, प्रतीक जगताप यांची नेमणूक करण्यात आली होती. हे पोलीस पथक पुरंदर तालुक्‍यातील फरारी आरोपींची माहिती घेत होते. त्यावेळी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यातील फरारी आरोपीची माहिती मिळाली. या गुन्ह्यातील फरारी आरोपी श्रीनाथ बडदे हा चांबळी गावातील पिठाच्या गिरणीसमोर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीची पिस्तूल व एक जिवंत काडतूस सापडले. सासवड पोलीस ठाण्यात तसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस पथकाला रोख बक्षीस जाहीर केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.