गावच्या मदतीला उरतली “भारत फोर्ज’

वनपुरी येथे ओढा खोलीकरणाच्या कामाला मदतीचा हात

वाघापूर- वनपुरी (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून जल संधारणाची चळवळ “फोर्सफुली’ राबविली जात असताना गावकऱ्यांच्या मदतीला आता भारत फोर्ज ही उतरली असून जल संधारणा बरोबरच मन संधारणाचे काम करणाऱ्या गावाला कंपनीने मदतीचा हात दिला आहे. यामुळे स्पर्धा संपली असली तरीही गावात ओढा खोलीकरणाचे काम जोरात सुरु आहे. यामुळे गावच्या पाणी साठा क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होवून आगामी काळात पाणी टंचाईची तीव्रता रोखण्यास मोठी मदत होणार आहे.

भारत फोर्ज सिएससार फंडाच्या प्रमुख लीना देशपांडे, समन्वयक जयदीप लाड, पुरंदर तालुका जलसेवक सागर काळे, अमित काळे, गावचे सरपंच नामदेव आप्पा कुंभारकर, माजी सरपंच रामदास कुंभारकर, नाथा बापू कुंभारकर, ग्रामपंचायत सदस्य मनोहर कुंभारकर, राजश्री कुंभारकर, संगीता कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, शिवाजी कुंभारकर, सतीश कुंभारकर, भिमाजी कुंभारकर, महादेव कुंभारकर, ग्रामसेविका शीतल आटोळे, दत्तात्रय कुंभारकर त्याच प्रमाणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

भारत फोर्ज सिएससार फंडाच्या प्रमुख लीना देशपांडे यांनी सांगितले की, ग्रामस्थांचा उत्साह पाहून आम्हाला इथे काम करण्यासाठी उत्साह आला आहे. एवढ्या वरच न थांबता संपूर्ण गावचा कायापालट होण्यासाठी आम्ही मदत करू. परंतु, गावातील ग्रामस्थांनी आमच्या खांद्याला खांदा लावून काम केल्यास यातून मोठी चळवळ उभी राहील आणि दुष्काळ हा शब्द कायमचा पुसून टाकण्यासाठी मोठी मदत होईल. तसेच वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन, ग्राम स्वच्छता अभियान यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लीना देशपांडे यांनी यावेळी केले आहे.

पुरंदर तालुका जलसेवक सागर काळे यांनी सांगितले की, ओढा खोलीकारणातून सुमारे 23 हजार घन मीटर गाळ काढला जाणार आहे. तसेच, होणारी गळती थांबविली जाणार आहे. यामुळे तलावात पाणी साठा मोठ्या प्रमाणात वाढून परिसरातील विहिरी, बोअर यांना त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यास मदत होईल, त्याच बरोबर दरवर्षी असा दुष्काळ पडून पाण्याची कमतरता जाणवत असल्याने पाणी बचत करताना ठिबक पद्धतीचा अवलंब करावा आणि कमी पाण्यावरील पीक पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन सागर काळे यांनी केले आहे. सरपंच नामदेव कुंभारकर यांनी प्रास्ताविकात गावच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती दिली. तर, नाथा बापू कुंभारकर यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.