“गारीगार’ची विनापरवाना विक्री धोकादायक

बारामतीच्या ग्रामीण भागात धंदा तेजीत; अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
बारामती, दि. 13 (प्रतिनिधी) – बारामती शहर आणि तालुक्‍यात उन्हाचे चटके वाढले आहेत. यामुळे थंडपेयांसह बर्फाचे गोळे, गारीगार याची मागणी वाढली आहे. ग्रामीण भागात हा धंदा तेजीत आहे. परंतु, असे पदार्थ तयार करताना वापरण्यात येणारे जिन्नस दर्जेदार नसल्याचे उघड आहे. तसेच, याकरिता वापला जणारा बर्फही उपलब्ध होईल, त्या पाण्यापासून तयार केला जात असल्याची वस्तुस्थिती आहे. अन्न औषध प्रशासनाकडून शहरी भागात कारवाई होत असताना ग्रामीण भागातही असे थंड पदार्थ विनापरवाना विकणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
बारामती शहर तसेच तालुक्‍याच्या ग्रामीण भागात थंडपेय, पदार्थांत मोठी आर्थिक उलाढाल होते.

तालुक्‍याच्या मोठ्या गावात कुल्फी, आईस कॅन्डी, बर्फाचे गोळे आदी थंड पदार्थ तयार करण्याचे छोटे मोठे कारखाने आहेत. परंतु, अशा कारखान्यांत पदार्थ तयार करताना आरोग्य विभागाने आखून दिलेले नियमांचे पालन होत नाही. असे पदार्थ तयार करताना वापरण्यात येणारे अन्य जिन्नसही निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे, असे असताना ग्रामीण भागात असे कारखाने सर्रास सुरू आहेत. तसेच, ग्रामीण भागात कुल्फी, गारीगार, कॅन्डी फिरून विकणाऱ्यांकडे कोणताही परवाना नसतो. अशा पदार्थांतून कित्येकदा मुलांना उलट्या, जुलाब झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु, उन्हाळ्यात केवळ मागणी असल्याने याकडे कमाईचा सिझन म्हणून पाहीले जाते. त्यात भर म्हणून असे पदार्थ तयार करताना वापरण्यात येणारा बर्फही “अखाद्य’ असल्याचे सांगितले जाते. सध्या, तर दुष्काळीस्थितीमुळे पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने बर्फाचे उत्पादनही कमी प्रमाणात होत आहे. परंतु, मागणी अधिक असल्याने नफा मिळवण्याच्या प्रयत्नात अशुद्ध पाण्याचा वापरही बर्फाकरिता केला जात आहे. आरोग्याशी निगडीत असल्याने बर्फ तयार करणाऱ्या कारखानदारांत बर्फासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने प्रत्येकी तीन महिन्यांतून तपासणे करणे बंधनकारक आहे. परंतु, अशी पाहणी केलीच जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.

  • उन्हाळा संपला की कारखाने “गायब’
    अन्न व भेसळ प्रशासन आणि नगरपरिषदेकडूनही असा बर्फ वापरणाऱ्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा अखाद्य बर्फ तयार करणाऱ्या कारखान्यांची कुठलीच नोंद अन्न परवाना विभागाकडे नसते. उन्हाळ्याचा सिझन संपला की, असे कारखानेही “गायब’ होतात. बर्फ उत्पादन करणाऱ्या कारखान्यांत दुष्काळीस्थितीत कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जाते, याची कोठेही तपासणी होत नाही. बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा तसेच तो अधिक काळ टिकावा, याकरिता त्यावर मोठ्या प्रमाणावर अमोनियमचा वापर केला जातो, त्यासह विविध वायूंचा वापर होत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अखाद्य बर्फ घातक ठरतात, त्यामुळे बर्फ तयार करणाऱ्यांची तपासणी होणे गरजेचे आहे.
  • दूषित पाण्यापासून बर्फ तयार करणारे कारखाने तसेच थंडपदार्थांची विक्री फिरून करणाऱ्यांबाबत तक्रारी आल्यास किंवा अशांकडून गैरप्रकार होत असल्यास त्याबाबतची माहिती अन्न औषध प्रशासनास कळविली जाते. या प्रकारांवर लक्ष ठेऊन आहोत. काही तक्रारी असल्यास नागरिकांनीही याबाबत माहिती द्यावी. त्यानुसार कारवाई केली जाईल.
    – सुभाष नारखेडे, आरोग्य अधिकारी, बारामती नगरपरिषद

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.