गायकवाड यांच्या जागी अन्य सदस्याची होणार नियुक्‍ती

पिंपरी –पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. तसेच स्थायी समितीचे आठ सदस्यदेखील निवृत्त होत आहेत. स्थायी समितीमध्ये आता नवीन सदस्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. तसेच नगरसेवकपद रद्द झाल्याने कुंदन गायकवाड यांचे क्रीडा समिती सदस्य पद रिक्‍त आहे. या पदावर भाजपच्या अन्य सदस्याची नियुक्‍ती केली जाणार आहे. हे दोन्ही सदस्य निवडीचे दोन स्वतंत्र प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड मनमहानगरपालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत संपुष्टात येत आहे. त्यांच्या जागी अन्य सदस्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार या सदस्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. गटनेत्यांकडून येणाऱ्या शिफारशीवरून या सदस्यांच्या नियुक्‍त्या केल्या जाणार आहेत.

कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा बुलढाणा जात पडताळणी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. आतापर्यंत नगरसेवक म्हणून गायकवाड यांना दिलेले सर्व भत्ते वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुंदन गायकवाड हे सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. सोलापूर जिल्ह्यात कैकाडी ही जात विमुक्त जात या प्रवर्गात मोडते. कुंदन गायकवाड यांनी विमुक्‍त जात या प्रवर्गातून पुण्यात जमीन मिळविली आहे. त्याबाबतचे पुरावे जात पडताळणी समितीसमोर सादर करण्यात आले. त्या आधारे कुंदन गायकवाड यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बुलढाणा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने अवैध ठरविले होते. तसेच त्यांना अनुसूचित जातीचे दिलेले फायदे तत्काळ काढून घेण्याचे आदेशही दिले होते. त्याच प्रमाणे गायकवाड यांनी बनावट कागदपत्रे सादर करून जात पडताळणी समितीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेशही दक्षता पथकाच्या पोलीस निरीक्षकांना दिले होते.
नागपूर खंडपीठाने गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला 1 सप्टेंबर 2018 पर्यंत स्थगिती आदेश दिले होते. त्यामुळे नगरसेवक गायकवाड यांना दिलासा मिळाला होता. परंतु, ही मुदत संपताच बुलडाणा जिल्हा जात पडताळणी समितीने 29 सप्टेंबर 2018 रोजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याचा अंतिम निकाल दिला आहे. गायकवाड यांचा कैकाडी अनुसूचित जातीचा दावा समितीने अमान्य केला आहे. त्यानुसार आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे पद रद्द केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.