गाडीचा विमा उतरवण्यापूर्वी हे वाचाच

गाडी कोणतीही असो, तिचा विमा उतरवणे हे आवश्‍यक आहे. नवीन गाडी खरेदी करताना विक्रेता हा विम्याची प्रक्रिया पूर्ण करूनच गाडी ग्राहकाला ताब्यात देतो. कालांतराने विमा नूतनीकरण करण्याची जबाबदारी वाहनचालकावर राहते. यासंदर्भात विमा कंपनीकडून रिमाइंडर येत असते. मात्र, सर्वच मंडळी विम्याचे नूतनीकरण करतात असे नाही. प्रामुख्याने दुचाकी वाहनांचे नूतनीकरण करण्यास बरेच जण उदासीन असतात; परंतु दुर्दैवाने एखादा फटका बसल्यावर विम्याचे महत्त्व पटते. त्याचवेळी चारचाकी किंवा दुचाकी वाहन असो विमा उतरवल्यानंतरही त्याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. विमा उतरवताना आपण पुरेशी काळजी घेतली नाही तर कंपनी दावा अमान्य करू शकते. त्यामुळेच गाडीचा विमा उतरवताना काही बाबी लक्षात घ्याव्यात.

मोटार वाहन कायद्यानुसार मोटार आणि अन्य वाहनांचा विमा उतरवणे बंधनकारक आहे. मात्र, काही वेळेस विमा उतरवताना चूक होऊ शकते. ही चूक दावा करताना महागात पडू शकते. अनेकदा मोटार चोरी होणे किंवा अन्य प्रकारची हानी झालेली असतानाही कंपनी दावा मान्य करत नाही. विमाधारकांच्या किरकोळ चुका यास कारणीभूत ठरतात. सर्वसाधारणपणे गाडीचा विमा उतरवताना चार महत्त्वाच्या चुका केल्यास विमा कंपन्या दावा मान्य करत नाहीत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अन्य नावाने विमा: जेव्हा काही जण जुनी गाडी खरेदी करतात, तेव्हा त्या गाडीचे कागदपत्र आपल्या नावाने करतात. मात्र, साधारणपणे विम्याच्या कागदपत्रात बदल करण्याचे टाळतात. त्यामुळे गाडीची नव्याने नोंदणी करताना विमा कंपन्यांना नाव बदलण्याबाबत आग्रह करावा. त्यानंतरच विमा कंपन्या नाव बदलतात. जर ही प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर विम्याचा दावा मिळतो. अन्यथा कंपनी कोणत्याही प्रकारचा विमा देण्यास नकार देते.

कालबाह्य वाहन परवाना: गाडी खरेदी करताना किंवा मोटार विमा घेताना आपल्याला वाहन परवान्याबाबत विचारणा केली जात नाही. मात्र, आपल्याकडे मुदतीतील सक्रिय वाहन परवाना असेल असे गृहित धरले जाते. जेव्हा आपण विमा कंपनीकडे दावा करतो, तेव्हा विमा कंपन्या अगोदर आपला वाहन परवाना मागतात. जर आपल्याकडे कालबाह्य किंवा मुदत संपून गेलेला वाहन परवाना असेल तर आपला दावा फेटाळला जाऊ शकतो. दुर्घटनेच्या वेळी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याचे आपण सांगितले तरी त्याच्याकडे अधिकृत वाहन परवाना असणे गरजेचे आहे. जर नसेल तर आपला दावा नामंजूर होऊ शकतो.

मोटार किंवा गाडीचा गैरवापर: जर आपण मोटार खासगी वापरासाठी खरेदी केली असेल तर त्या गाडीचा व्यवसायासाठी वापर करू शकत नाही. जर असे आढळून आल्यास विमा कंपन्या दावा मान्य करत नाहीत. अशा दाव्याच्या वेळी विमा कंपन्या एक सर्व्हे एजंट नेमते. तो पूर्णपणे दाव्याची पडताळणी करतो. एजंटपासून एखादी बाब लपवणे सोपे नाही. अशा स्थितीत वाहनाचा चुकीच्या गोष्टीसाठी वापर केला जात असेल तर तो एजंट सहजपणे चोरी पकडू शकतो.

मद्यपान करून गाडी चालवणे: विमा दावा फेटाळण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मद्यपान करून गाडी चालवणे होय. जर अल्कोहोल आणि नशापाणी करून गाडी चालवत असाल आणि अपघात झाल्यास विमा कंपनी कोणत्याही प्रकारचा दावा देत नाही. सर्व विमा पॉलिसीमध्ये या गोष्टीचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो.

– मृदुला फडके 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)