गाजर गवताचं एकात्मिक पद्धतीनं निर्मूलन 

गाजर गवताचे शास्रीय नाव पार्थेनियम हिस्टरोफोरस असून हे परदेशी तण म्हणून ओळखले जाते. गाजर गवतास कॉंग्रेस किंवा पांढरफुली या स्थानिक नावाने ओळखले जाते. हे ऍस्टेसी कुळातील असून याचे उगमस्थान वेस्ट इंडीज , मध्य किंवा उत्तर अमेरिका मेक्‍सिको आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम 1955 मध्ये हे तण पुण्यात आढळून आले. आपल्या देशात 1955 साली अमेरिका आणि कॅनडा या देशातून आयात करण्यात आलेल्या गव्हाबरोबर गाजरगवत काही काळातच जवळपास 3.5 मिलियन हेक्‍टर क्षेत्रावर या तणाचा प्रसार झाला. भारताशिवाय नेपाळ, चीन, व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलियाच्या विविध भागांमध्ये या गवताचा प्रसार झालेला दिसून येत आहे. 
सन 1986 मध्ये गाजर गवताच्या नियंत्रणासाठी डॉ. वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाने परभणी येथे मेक्‍सिकन भुंगे गाजर गवतावर सोडले असता त्यांना फार मोठ्या प्रमाणावर गाजर गवताचा नाश झाल्याचे आढळून आले आहे.
कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने च्या कार्यक्षेत्रात सुद्धा गाजरगवताचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून गाजर गवताच्या निर्मुलनासाठी श्री. ज्ञानेश्‍वर सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या संयुक्त विध्यामाने गाजर गवताचे जैविक पद्धतीने निर्मुलन करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील वर्षी कुकाणा येथील प्रगतशील शेतकरी कुमारदादा देशमुख यांच्या शेतावर तसेच कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर तसेच दहिगाव ने तालुका शेवगाव मध्ये मोठ्या प्रमाणात हे भुंगेरे सोडण्यात आले होते. यावर्षी सुद्धा गाजर गवत निर्मुलनासाठीमेक्‍सिकन भुंगेरे सोडण्यात येणार आहेत.
मागील वर्षी कुमार दादाना मेक्‍सिकन भुंग्यांमुळे गाजार गवताचे चांगले निर्मुलन झाल्याचे दिसून आले आहे.
* गाजर गवताचे दुष्परिणाम : गाजर गवताच्या स्पर्शामुळे ऍलर्जी , अंग खाजणे, दम, श्‍वसनाचा त्रास होणे, सर्दी, शिंका, अंग सुजणे इ. दुष्परिणाम होत असल्याचे तसेच दुभत्या जनावरांनी खाल्यास दुधास कडू वास येणे, शेतातील पिकांबरोबर अन्नासाठी स्पर्धा केल्याने उत्पादनात घट येते, पडीक जमिनीतील जनावरांच्या चराई क्षेत्रात घट होणे, पराग कणांमुळे तेलबिया, भाजीपाला, फळे इ. पिकांच्या उत्पादनात घट होण्यासारखे प्रकार गाजर गवतामुळे होतात.
* गाजरगवत निर्मुलन करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज: 
आपल्या देशातसर्व ठिकाणी गाजरगवत जागृती सप्ताह दि. 16 ते 22 ऑगस्ट दरम्यान साजर करण्यात येतो. त्यासाठी कृषि विज्ञान केंद्र , दहीगाव-ने तर्फे शिवारफेरी, व्याख्याने, शेतकरीसमूह चर्चा, पोस्टर्स लावणे, घडी पत्रिका वाटणे तसेच कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी मंडळ, महिला मंडळ व विविध शाळा कॉलेजमध्ये गाजरगवत निर्मूलनाचे विविध कार्यक्रम राबविल्यामुळे गाजरगवतनिर्मुलन सहज होण्यास मदत झाली. हा कार्यक्रम 2015 पासून केंद्रांतर्गत राबविण्यात आल्यामुळे गाजरगवताचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.
* गाजरगवत निर्मूलनाचे एकात्मिक उपाय: 
* प्रतिबंधक उपाय : 
पडीक जमीन, शेताचे बांध, कंपोस्ट खड्डे, रस्ते, रेल्वे रूळ, इमारती लगतच्या जागा, अशा ठिकाणी हे तण फुलावर येण्यापूर्वी मुळासकट उपटून काढून नष्ट करावे. त्यामुळे गाजरगवताच्या बियांचे उत्पादन होत नसल्याने प्रसार थांबविण्यास मदत होते.
* निवरणात्मक उपाय : लागवड क्षेत्रात वेळोवेळी आंतरमशागत तसेच विविध सिफारशीत तणनाशकांचा वापर केल्यास गाजरगवताचे नियंत्रण करता येते. त्याचप्रमाणे बिगर लागवड क्षेत्रात उगवणाऱ्या गाजरगवताची 2,4 डी- हे तणनाशक 60 ग्रॅम किंवा ग्लायफोसेट60-70 किंवा मेट्रीब्युझीन 45-60 ग्रॅम यापैकी एक तणनाशकाचीप्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* जैविक किड नियंत्रणाची गरज : 
1.गाजर गवत विषारी असल्याने त्याचे निर्मुलनासाठी सहजासहजी मजूर वर्ग उपलब्ध होत नाही. 2. रासायनिक तणनाशके महागडी असल्याने वारंवार त्याचा वापर करणे आर्थिक दृष्ट्‌या परवडत नाही. 3. सार्वजनिक क्षेत्रात गाजर गवताच्या निर्मूलनाचा खर्च शासन पेलू शकत नाही.
4. त्याचप्रमाणे रासायनिक तणनाशकांचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळे ते जैविक पद्धतीने मेक्‍सिकन भुंग्यांचा वापर करणे काळाची गरज आहे.
* झायगोग्रामा भुंग्यांची ओळख : हा भुंगा मेक्‍सिकोतून आयात केलेला असल्यामुळे त्यास मेक्‍सिकन भुंगा असेही म्हटले जाते.याचे प्रौढ मळकट असून त्यावर काळसर रंगाच्या नागमोड्या रेषा असतात. प्रौढ आकाराने मध्यम, 6 मिलीमीटर लांब असतात. मादी भुंगे नर भुग्यापेक्षा आकाराने मोठे असतात.
* झायगोग्रामा भुंग्यांचा जीवनक्रम : मादी भुंगे वेगवेगळे किंवा गुच्छात पानांच्या खालील बाजूवर जवळपास 2000 अंडी घालतात. अंड्यांचा रंग फिक्कट पिवळा असून अंड्यांतून अळ्या बाहेर पडण्याच्या वेळी लालसर होतो. अंडी अवस्था 4 ते 6 दिवसांची असून आळयांच्या चार अवस्था 10 ते 11 दिवसात पूर्ण होतात. त्याचप्रमाणे कोषावस्था हि 9 ते 10 दिवसांची असते. या भुंग्यांचा एकूण कालावधी 2 ते 3 महिन्याचा असून ते गाजर गवताच्या पानांवर उपजीविका करतात.
* झायगोग्रामाच्या वापरातून गाजर गवताचे निर्मुलन : अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या गाजर गवताच्या शेंड्यांची पाने खातात. प्रथम अळ्या शेवटच्या कळ्या, सहकळया आणि नंतर पानांच्या कडा खातात. तरुण अळ्या झाडांची वाढ आणि फुले येण्याचे थांबवितात. पूर्ण वाढलेल्या अळ्या रंगाने पिवळ्या पिवळ्या पडतात आणि कसलीही हालचाल न करता सूक्ष्म होऊन जमिनीवर कोषावस्थेत जाण्यासाठी पडतात कोषामधून 9 ते 10 दिवसांनी भुंगे जमिनीतून निघतात. पावसळ्यात जुन ते ऑक्‍टोबरपर्यंत भुंगे गाजर गवत फस्त करतात.
भुंगे आणि अळ्या फक्त गाजर गवतावरच जगतात. भुंगे व अळ्यांची गाजर गवत खाण्याची गती कमी असल्यामुळे आणि गाजर गवताची वाढ लवकर होत असल्यामुळे गाजर गवताचे ताबडतोब नियंत्रण दिसून येत नाही. अन्नसाखळीतील घटक असल्यामुळे हे भुंगे महत्वाचे आहेत गाजर गवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमिनीत सुप्तावस्थेत जातात. नोव्हेंबर नंतर भुंगे जमिनीत 7 ते 8 महिने दडून बसतात आणि पुढील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्यास सुरुवात करतात.
हे भुंगे एखादया वातावरणात एका ठिकाणी स्थिर झाले की पुढच्यावर्षी पुन:पुन्हा भुंगे सोडण्याची गरज पडत नाही. गाजर गवताच्या उच्च्याटनासाठी शेतात प्रति हेक्‍टरी 500 भुंगे सोडल्यास हे भुंगे स्थिर होऊन गाजर गवताचे प्रभावी नियंत्रण करतात. शक्‍यतो मनुष्य प्राण्यांचा अडथळा होणार नाही अशी जागा भुंगे सोडण्यासाठी निवडावी. झायागोग्रामामुळे मनुष्य प्राण्याला कोणताही त्रास होत नाही उलट उपद्रवी गाजर गवतावर झायगोग्रामा आपली उपजीविका करून मनुष्य प्राण्यावर एक प्रकारे उपकारच करतात. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा झायगोग्रामामुळे गाजर गवताचे प्रभावी नियंत्रण पहावयास मिळते.
झायगोग्रामा/ मेक्‍सिकन भुंगे हे परोपजीवी कीटक संशोधन योजना, कृषि कीटकशास्र विभाग, डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे ऑगस्ट ते ऑक्‍टोबर पर्यंत विक्रीस उपलब्ध असतात.
पिक संरक्षण विभाग 
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने 
ता. शेवगाव 
फोन. न.02429 – 272020 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)