“गाजरं’ दाखवणारे आता हद्दपार करा

अजित पवार यांचे आवाहन : लोणीकाळभोर येथे डॉ. कोल्हेंच्या प्रचारार्थ सभा

लोणीकाळभोर- निवडणुका आल्या की आश्‍वासनांचे गाजर दाखवायचे आता बंद करा. तीनवेळा तुम्हाला संधी दिली; पण विकास झाला नाही. त्यामुळे आता आम्हाला संधी द्या, मग पहा मतदारसंघाचा कायापालट कसा होतो, अशी साद माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मतदारांना घालत डॉ. अमोल कोल्हे यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ लोणीकाळभोर येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. यावेळी सक्षणा सलगर, देविदास भन्साळी, माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जालिंदर कामठे, प्रदीप गारटकर, सुरेश घुले, प्रदीप कंद, प्रवीण कामठे, महेश ढमढेरे, राहुल चोरघडे, शिवदास काळभोर, सीमा काळभोर, दिलीप वाल्हेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सक्षणा सलगर म्हणाल्या की, जिओचा फुकटचा डेटा वापरुन ट्रोल करणारे फुकटे-लावारीस भक्‍त यांच्याविषयी भाजप नेतृत्वाने भूमिका स्पष्ट केली का नाही. तसेच तुम्हाला नेता पाहीजे की अभिनेता असे आदित्य ठाकरे म्हणतता, अरे पेंग्विनचा फोटो काढणाऱ्याने आता मुंबईत फोटोग्राफीचे दुकान काढावे असा टोला त्यांनी लगावला. या युतीच्या कारभाराला नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे आता महाआघाडीचे वादळ घोंघावत असल्याने डॉ.कोल्हे यांना मताधिक्‍य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

  • ठाकरे सत्तेला हपापलेले
    अजित पवार म्हणाले की, आजपर्यंत एकमेकांची उणीदुणी काढणारे भाजप-शिवसेनावाले आज गळ्यात गळे घालून चांगले आहे असे दाखवत आहेत. ठाकरे हे सत्तेला हपापलेले आहेत. शिवशाही ही खासगी लोकांसाठीच फायद्याची आहे. भाजपचे काय तर धनिकांसाठीच कारभार आहे. 15 उद्योगसमुहांचे 3 लाख कोटी माफ केले, पण शेतकरी गरीब वर्गाला वाऱ्यावर सोडले. कामगारांना वाऱ्यावर सोडून कंपनीमालकांचे धोरण राबविले जात आहे.नोटबंदीतही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मुद्रा लोन, स्मार्ट सिटी, मेक ईन इंडिया अशा अनेक घोषणा झाल्या, पण पुढे झाले काय तर काहीच नाही. उलट तंदुरी चहा विकुन मुलगी घर चालविते, अशी दशा सुशिक्षित तरुणाईची झाली आहे. बेरोजगारी वाढली आहे पण सरकार सुस्त आहे अशी टीका अजित पवार यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.