गांभीर्य …

– हिमांशू 

काही बोलायला जावं तर हल्ली चमत्कारिक परिस्थिती निर्माण झालीय. एक तर तुम्ही कशाचे तरी समर्थक असू शकता किंवा विरोधक. समर्थन किंवा विरोध दोन्ही न करता एखाद्या गोष्टीच्या गुणदोषांचं तटस्थपणे मूल्यमापन करणं जवळजवळ अशक्‍य झालंय. ही परिस्थिती राजकारणापासून इतर क्षेत्रांमध्ये फोफावली असली, तरी तिची गंगोत्री मात्र तंत्रज्ञानात आहे. जे राजकारणाचं, तेच तंत्रज्ञानाचं. किंबहुना जे काही राजकारणाचे झाले, त्याची सुरुवात तंत्रज्ञानामुळेच झालीय, असं म्हणायला हरकत नाही. खिशाखिशात तंत्रज्ञान आल्यामुळं मतं मांडणं इतकं स्वस्त झालंय की, मतप्रदर्शनापूर्वी विचार नावाची प्रक्रिया करावी लागते, हेही आपण विसरलोय. तंत्रज्ञानाच्या अशा विचारशून्य वापराला हरकत घेतली की, संबंधिताला तंत्रज्ञानविरोधी ठरवायला आम्ही मोकळे! तंत्रज्ञान जगभरात फोफावलंय, विशेषतः दूरसंचार क्षेत्रातल्या क्रांतीनं जग बदलून टाकलंय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण गर्दीला शांत करण्याची या क्षेत्राची जी ताकद भारतात दिसली, ती जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात दिसलेली नाही. समोरासमोर बसलेल्या व्यक्‍ती एकमेकांशी बोलतही नाहीत आणि मोबाइलमध्ये माना खुपसून बसतात. प्रवासात पूर्वी शेजारच्या अनोळखी प्रवाशाशी ओळख काढून गप्पा मारल्या जायच्या. आज शेजारचा प्रवासी ओळखीचा, नात्यागोत्याचा असला तरी दोघंही एकमेकांशी न बोलता सोशल मीडियावर व्यस्त असतात. तंत्रज्ञान विशेषतः सोशल मीडिया जरा जास्तच सीरिअसली घेतला जातोय, असं नाही वाटत? हे गांभीर्य इतकं वाढत चाललंय की, त्यामुळं माणसं तुटायला लागली आहेत. एवढं तरी आपल्याला पाहावंच लागेल. संचार तंत्रज्ञानावर आक्षेप घेणाऱ्यांना म्हातारं ठरवणाऱ्यांनी मुंबईतली परवाची ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा पाहायला हवी होती. बदलत्या जगात स्मार्टफोन वापरणं अनिवार्य झालंय आणि त्याचे वेगवेगळे फायदे आणि ऑपरेशन्स समजून घ्यायलाच हवीत, हे मान्य करून या कार्यशाळेला अनेक म्हातारे-कोतारे उत्साहानं आले होते. एक 89 वर्षांचे आजोबा तर नालासोपाऱ्यापासून दादरला आले होते. मोबाइल सायलेन्ट कसा करावा, रिंगटोन कशी बदलावी, अशा साध्या गोष्टींपासून डिजिटल व्यवहारांपर्यंत अनेक गोष्टी ज्येष्ठ नागरिकांना एका स्वयंसेवी संघटनेनं शिकवल्या. या विषयावर काढलेल्या नोट्‌सची पुस्तिका वाटली. आता हे ज्येष्ठ नागरिक स्मार्टफोनचा जेवढा आणि जसा वापर करतील, ती आदर्श स्थिती मानायला हरकत नाही.

स्मार्टफोनला त्याहून अधिक सीरिअसली घेतल्यामुळं अनेक घोटाळे होऊ लागलेत. जळगावात काही दिवसांपूर्वी एका तरुणानं तरुणीला मेसेज पाठवला, की काळा शर्ट-पॅंट आणि काळी टोपी घालून मी बिग बझारमध्ये भेटायला येतोय. (हल्ली मॉल हे प्रेमिकांना भेटीसाठी हक्‍काचं ठिकाण ठरलंय, तेही एसी!) तरुणीच्या भावानं तेवढाच मेसेज वाचला आणि तसाच पोषाख करून आलेल्या वेगळ्याच दोन तरुणांना बेदम मारलं. त्या दोघांचाही तरुणीशी काडीचा संबंध नव्हता. उत्तर प्रदेशात तर एका महिलेनं नवऱ्याविरुद्ध पोलिसात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली. तीही नवऱ्यानं दोघांचा एकत्रित फोटो “डीपी’ म्हणून ठेवला नाही, एवढ्या क्षुल्लक कारणावरून. आता हे माध्यम एवढं सीरिअसली घेतलं जातंय म्हटल्यावर व्यावसायिक मागे कसे राहतील? नको असलेले व्यावसायिक फोन, मेसेज नको त्या वेळी येणारच! कॉल संपल्यावर स्क्रीनवर येणाऱ्या जाहिरातीही सहन कराव्याच लागणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)