गणेशोत्सावाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची मोर्चेबांधणी

सातारा, (प्रतिनिधी) –
सातारकरांच्या मनातील सर्वात मोठा नागरी उत्सव ठरणाऱ्या गणेशोत्सवातील बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदाच्या वर्षी हा बंदोबस्त अधिक कडेकोट केला जाणार असून रस्त्यावरील वाहतूक कोंडी तसेच कोणताही अपप्रकार टाळण्यासाठी अनेक उपाय योजले जात आहेत. तसेच काही निर्बंधही प्रथमच लादले जाण्याची शक्‍यता आहे. या विशेष बंदोबस्ताची आखणी पोलिस मुख्यालयात सध्या सुरू असून यंदा नियमित बंदोबस्ताव्यतिरिक्त शुन्य पार्किंग, फेरीवाला मुक्त मार्ग, तसेच अनेक बंदीचा त्यात समावेश असणार आहे.
साताऱ्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. हा गणेशोत्सव सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांनी गेल्या दोन काही दिवसापासून तयारी सुरू केली आहे. साताऱ्यात गेल्यावर्षी एकूण दोनशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे होती तर हजारोंच्या संख्येत घरगुती गणपती होते. यंदाही त्यात वाढ होऊ शकते. सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच शहरात सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी संपूर्ण पोलीस दल रस्त्यावर उतरणार आहे.
गणेशोत्सव बंदोबस्तात प्रामुख्याने जमाव नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था, मिरवणुकीचे संरक्षण, रस्त्यावरील गुन्हे रोखणे आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे या पाच मुद्यांवर होतो. या पाच मुद्यांच्या आधारेच व्यूहरचना करून पोलीस बंदोबस्ताची विभागणी करतात. विसर्जन मिरवणूक हा त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग असतो. मिरवणुकीदरम्यान म्हणजे गणेशाची मूर्ती आपल्या स्थानावरून विसर्जन स्थळापर्यंत जाईपर्यंत विविध प्रकारचा बंदोबस्त असतो. यावेळी अनेक मार्ग बंद केले जातात तसेच अनेक मार्ग एकदिशाही केले जातात. मात्र ग्रेड सेपरेटच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी ऐकीरीला अडथळा ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापूर्वी पोलिस विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर चारचाकी वाहनांना बंदी घालायचे. पण सध्याचे वातावरण पाहता पोलिस कुठलाही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळे यावर्षी झीरो पार्किग ही संकल्पना अंमलात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्हणजे ज्या मार्गावरून विर्सजन मिरवणूक जाईल तेथे अगदी सायकलीलासुद्धा पार्किंग करायला परवानगी मिळणार नाही. याबाबत नागरिकांना सतत ध्वनीक्षेपकामार्फत सूचना दिल्या जातील. सर्वसामान्य लोकांना याचा जरी काही वेळ त्रास होणार असला तरी सुरक्षेसाठी हे अत्यावश्‍यक असल्याचा पोलिस सूत्रांचा दावा आहे.
गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरत असतात. प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. अशा ठिकाणी पदपथावरील फेरीवाल्यांचा मोठा अडसर असतो. त्यासाठी पोलिसांनी फेरीवाल्यांना केंद्रीत करणे गरजेचे आहे. ध्वनीप्रदूषण करणाऱ्या फेरीवाल्यांकडील पिपाणी आणि तत्सम वस्तूंवरही विक्रीस बंदी घालण्याचा पोलिसांचा विचार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)