गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश

वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतला कोकणातील रस्ते वाहतुकीचा आढावा 

मुंबई: गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांना खराब रस्त्यांमुळे त्रास होऊ नये व खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने दक्षता घ्यावी. तसेच वाहतूक पोलीसांनीही या मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी नियोजन करावे, असे निर्देश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) रश्मी शुक्ला यांनी आज दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे महामार्गावर करण्यात येणाऱ्या उपाय योजनासंदर्भात आज रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात बैठक झाली. त्यांनी कोकणात जाणाऱ्या मार्गांवर उपाययोजना राबविण्यासंबंधी यावेळी सूचना केल्या.

रश्मी शुक्ला म्हणाल्या, गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्ग, पाली-खोपोली मार्ग, सायन पनवेल महामार्ग, मुंबई – पुणे महामार्ग या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात मुंबईतील नागरिक आपल्या गावी जात असतात. गणेशोत्सव काळात एसटी, तसेच खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी. तसेच नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा,यासाठीही नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

कोकणात जाणाऱ्या मार्गांवर दिशादर्शक फलक लावावेत, आवश्यक तेथे बॅरिकेटस् उभारण्यात यावेत. रुग्णवाहिका, बंद पडलेली वाहने उचलण्यासाठी क्रेन्सची व्यवस्था सर्व मार्गांवर करण्यात यावी. वाहतूक कोंडीच्या वेळी प्रवाशांना जेवण अथवा नाष्ट्याची सोय होईल, यासाठीही ठिकठिकाणी स्टॉल उभारावेत,अशा सूचनाही शुक्ला यांनी यावेळी केली.

बैठकीस वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक विजय पाटील यांच्यासह ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पोलीस अधिकाऱ्यांसह महामार्ग पोलीस,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, परिवहन, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, रस्त्यांची कामे करणारे कंत्राटदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)