गणेशोत्सव काळात जमा केलेल्या निर्माल्याचे बनविणार खत

सुमारे 350 टन निर्माल्य जमा : खतांचे वितरण शेतकऱ्यांना करणार

पिरंगुट:  गणेशोत्सव काळात सुमारे 350 टन निर्माल्य गोळा केले आहे. या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. सध्या कंपोस्ट खत तयार करण्याचे काम चालू असून या खताचे वितरण शेतकऱ्यांना केले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यातील कमिन्स इंडिया फाऊंडेशन, गोविज्ञान संशोधन संस्था, द क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, स्वच्छ सेवा सहकारी संस्था, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिवन संवर्धन फाउंडेशन, सर्वज्ञ विकास प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिरंगुट येथील साप्ताहिक मिलन, आबासाहेब शेळके मित्र मंडळ तसेच भुगाव, भुकुम, पिरंगुट, कासारआंबोली, शिवणे येथील ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव कालावधीत विविध ठिकाणाहून हे निर्माल्य गोळा केले आहे.

स्वच्छ सेवा सहकारी संस्थेने पुणे महानगरपालिका हद्दीतील चौदा घाटांवर, गोविज्ञान संशोधन संस्थेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पाच, मुळशी तालुक्‍यातील पाच आणि शिवणेतील दोन घाटावर असे एकून 26 घाटांवर निर्माल्य संकलन काम केले आहे.

या उपक्रमासाठी कमिन्सचे सौमित्र मेहरोत्रा, अवंती कदम, संदीप क्षीरसागर, प्रशांत चितळे, अनिल कुलकर्णी, सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त उमेश माळी, गोविज्ञान संशोधन संस्थेचे अनिल व्यास, आनंद पाठक, प्रतिष पारखी, राजेंद्र लुंकड, प्रदिप पाटील, अशोक वाळके, स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे प्रिया कचोरीया आदींचे विशेष सहकार्य लाभले.

कमिन्स इंडिया फाऊंडेशनचे सुमारे 500 अधिकारी आणि कर्मचारी या 26 घाटांवर स्वतः पाचव्या तसेच अकराव्या दिवशी विसर्जन घाटावर लोकांमध्ये पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच निर्माल्य दान करण्याचे आवाहन लोकांना करीत होते. कोथरुड परिसरात रॅली काढून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या निर्माल्य प्रकल्पासाठी लागणारा सर्व खर्च कमिन्स इंडिया फाऊंडेशन करीत आहे. अशी माहिती कमिन्सचे प्रकल्प समन्वयक संदीप क्षिरसागर यांनी दिली.

मागील वर्षी बनविले 110 टन खत

निर्माल्यापासून खत तयार करण्याचे संपूर्ण काम गोविज्ञान संशोधन संस्थेमार्फत केले जाते. मागील वर्षी याच घाटांवर सुमारे 220 टन निर्माल्य संकलित करुन यापासून 110 टन कंपोस्ट खत तयार केले घेले. यावर्षी यात वाढ होऊन सुमारे 350 टन निर्माल्य संकलित करुन यापासून 175 टन कंपोस्ट खत तयार होईल. खत तयार करण्यासाठी भारतीय गाईचे शेण आणि गोमुत्र वापरल्याने मागील वर्षी या खताची लॅबमध्ये तपासणी केली असता यात 27 टक्‍के एवढ्या उच्च प्रमाणात सेंद्रीय कार्बन आढळून आला.

 सुमारे 2.5 टन निर्माल्य जमा

गोविज्ञान संशोधन संस्थेचे अनिल व्यास यांनी सांगितले की, संशोधन संस्थेमार्फत पुण्यातील 45 मोठ्या सोसायट्यांमध्येही जागृतीचे काम केले गेले. त्यांना घरगुती आणि मंडळाच्या गणपतीच्या वेळी जमा झालेल्या निर्माल्यासाठी पिशव्या देण्यात आल्या होत्या. येथून सुमारे 2.5 टन निर्माल्य संकलित झाले. कंपोस्ट खत तसेच जमा झालेल्या फळांपासून पिकांसाठी संजिवनी अर्क आणि नारळांपासून रोपवाटिका केली जाणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी गोआधारीत शेती या विषयावर व खत कसे वापरावे या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेऊन त्यांना मोफत या गोष्टी वाटण्यात येणार आहे. तसेच सहभागी सोसायट्यांमध्येही खत वाटप करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)