गणेशोत्सवात पीएमपी उत्पन्नात घट

गतवर्षीच्या तुलनेत यंदा अडीच कोटींचा फटका

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान साडेपंधरा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पीएमपीकडून गणेशोत्सवात देखावे पाहणाऱ्यांसाठी रात्री उशिरापर्यंत विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तिकीट विक्री, आराम बस, पासेसच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळालेले असून गतवर्षीच्या उत्सव काळातील उत्पन्नाच्या तुलनेत यंदाचे उत्पन्न अडीच कोटी रुपयांनी घटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेशोत्सवात देखावा पाहायला येणाऱ्या नागरिकांसाठी पीएमपीने रात्री दहा वाजल्यानंतर 650 विशेष बस सेवांचे नियोजन केले होते. मात्र, उत्सवाला गर्दी कमी असल्याने प्रवाशांवर परिणाम होऊन उत्पन्न घटल्याचे सांगण्यात येत आहे. दि.13 ते 23 सप्टेंबर या 10 दिवसांत 15 कोटी 63 लाख 36 हजार 270 रुपये उत्पन्न मिळाले. या कालावधीत जादा बसेससह सकाळच्या सत्रात सरासरी 1,374 तर दुपारच्या सत्रात सरासरी 1,306 बसेस सोडण्यात आल्या होत्या. दहा दिवसांतील तिकीट विक्री, पास विक्री, आराम बसेसच्या उत्पन्नाचा समावेश आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवात 18 कोटी 2 लाख 55 हजार 422 रुपये उत्पन्न मिळाले होते.

देखावे पाहण्यासाठी शहर तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक शहरात येतात. त्यामुळे उत्सवाच्या काळात सर्वच मार्गांवर पीएमपी बसला प्रचंड गर्दी होते. पाच दिवसांच्या गणपतीचे, तसेच गौरीचे विसर्जन झाल्यानंतर देखावे पाहायला येणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र यंदा शहरातील गणेशोत्सवाला तुलनेने गर्दी कमी होती. याचा परिणाम प्रवासी संख्येवर होऊन पीएमपीला मिळणाऱ्या उत्पन्नाला फटका बसला आहे.

गणेशोत्सवातील उत्पन्न
2018 : 15 कोटी 63 लाख 36 हजार 270
2017 : 18 कोटी 2 लाख 55 हजार 422
2016 : 16 कोटी 64 लाख 49 हजार 485

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)