गडकरींनी व्यक्त केले आडवाणींसारखेच मत

लोकशाहीत विरोधकांच्याही मताचा सन्मान व्हावा

नवी दिल्ली – लोकशाहीत विरोधकांच्या मतांचा सन्मान केला पाहिजे. त्यांना राष्ट्रद्रोही म्हणता कामा नये ते आमचे विरोधक असतीलही पण आम्ही आमच्या काळात विरोधकांना कधीही राष्ट्रद्रोही म्हटले नव्हते असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी अलिकडेच आपल्या ब्लॉग मधून केले होते. भाजपचे आणखी एक ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनीही तसेच मत व्यक्त करीत आडवाणी यांचीच री ओढली आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी लोकशाहींत विरोधकांच्या मतांचा सन्मान केलाच पाहिजे अशी भूमिका मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आडवाणी यांनी व्यक्त केलेल्या मतांवर गडकरी यांना प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले की आम्ही भाजपच्या अगदी सुरूवातीच्या काळापासूनच विरोधकांना कधीही शत्रु मानलेले नाही.आमच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेत आम्ही आमच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्यांना कधीही देशद्रोही असे संबोधलेले नाही असे ते म्हणाले. लोकशाहीत मतभेद असतातच. कोणी आपल्या मतांचा असो अथवा विरोधी मतांचा त्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार असलाच पाहिजे. विरोधी मत व्यक्त करणारांना आम्ही देशविरोधी मानत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळच्या निवडणुकीविषयी विचारले असता ते म्हणाले की मागच्या निवडणुकीत लोकांनी युपीएच्या विरोधात मतदान केले. पण यावेळी लोकांनी आम्हाला आमची कामे पाहून मतदान केले आहे. गडकरी यांच्या नागपुर मतदार संघातील मतदान काल 11 एप्रिल रोजी संपले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.