खोडवा, निडवा ऊस उन्हाने लागला करपू

इंदापुरातील स्थिती; कालव्यांची आवर्तने बंद असल्याने स्थिती

भवानीनगर- इंदापूर तालुका नीरा व भीमा नद्यांनी वेढलेला असल्याने तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकरी ऊसाची लागवड करतात. परंतु, दुष्काळी स्थितीमुळे गेल्या वेळी उसाचे उत्पादनच कमी क्षेत्रात घेण्यात आले. यामुळे कारखान्यांचा गळीत हंगामही लवकरच संपला. आता, वाढते ऊन आणि खोडवा, निडव्याला पाणी नसल्याने वाढीला लागलेला ऊस करपण्याची शक्‍यता आहे.

इंदापुर तालुक्‍यात कर्मयोगी, नीरा-भीमा, छत्रपती, हरणेश्‍वर, बारामती ऍग्रो यासह सोनाई गूळ प्रक्रिया कारखाना असल्याने तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होते. परंतु, गेली दोन ते तीन वर्ष सतत दुष्काळी स्थितीशी ऊस उत्पादक शेतकरी झगडत आहे. यातूनच ऊस लागवडीचे प्रमाण घटले आहे. एफआरपीच्या मुद्यामुळेही शेतकरी उसापेक्षा अन्य पीकांकडे वळल्याने ऊस लागवडीतही घट झाली. यावर्षीही उसाचे प्रमाण कमी असल्याने तालुक्‍यातील गळीत हंगाम वेळेत संपला. इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी स्थितीमुळे नव्याने ऊस लागवडी सुरू झालेल्या नसल्या तरी खोडवा आणि निडव्याला पाणी नसल्याने हा ऊस जगवायचा कसा? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.
इंदापुरात सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरीच्या पाणी पातळी खाली गेली आहे. यामुळे उसाला पाणी कमी पडू लागले आहे. वाढत्या उन्हाबरोबरच आता महावितरणने भारनियमनाचा खेळ सुरू केला आहे. नीरा-भिमा नद्यांवरील आवर्तने बंद असल्याने पाणी कमी पडू लागले आहे. वाढीस लागलेले पीक करपत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

  • निवडणुकीच्या कामात संचालक व्यस्त….
    इंदापूर तालुक्‍यातील कारखाने राजकीय पुढाऱ्यांच्या व्यवस्थापनाखाली आहेत. हे कारखाने उसाच्या नोंदी घेऊन जातात. परंतु, याकरिता लागणारे पाणी कोठून मिळणार याकडे लक्ष द्यायला संचालकांसह पुढाऱ्यांना वेळ नाही. सध्या, तर लोकसभा निवडणुकीच्या कामात ही संचालक मंडळी व्यस्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी जायचे कोणाकडे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.