“खोटे बोलून श्रेय लाटण्याचा प्रयत्न’

कोंढवा – पुलाचे भूमिपूजनापासून ते सर्व परवानग्या मिळविण्यासाठी आपण सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले. या पुलासाठी विद्यमान आमदाराने एक रुपयाचाही निधी उपलब्ध करून दिलेला नसतानाही खोटे बोलून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका करत शिवसेनेचे माजी आमदार व शहरप्रमुख महादेव बाबर यांनी छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाचे उद्‌घाटन शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या प्रतिकात्मक शिवाजी महाराजांच्या हस्ते फित कापून केले.

कोंढवा खुर्द येथील लुल्लानगर चौकातील उड्डाणपुलाच्या उद्‌घाटनावरून सेना-भाजपच्या आजी-माजी आमदारांमध्ये जोरदार श्रेयवाद उफाळून आला आहे. त्यामुळे हडपसर मतदारसंघात भाजप-सेनेचे मनोमिलन झालेच नसून युतीत दुफळी असल्याचे यावरून स्पष्ट होते. गेल्या अनेक दिवसांपासून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोंढवा खुर्द येथील लुल्लानगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाचे उद्‌घाटन दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले होते. तर शनिवारी शिवसेनेकडून करण्यात आले. त्यामुळे या पुलाचा श्रेयवाद चांगलाच रंगत आहे.

माजी आमदार व शहरप्रमुख महादेव बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्यावतीने ढोल-ताशा, बॅंड, गुलाल, फटाक्‍यांची आतशबाजी करत भगवे फेटे परीधान करून पुलाचे उद्‌घाटन केल्यानंतर वाहनचालकांना लाडु वाटुन हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याचे जाहीर करण्यात आले. शिवसेनेच्या महिला आघाडी शहरप्रमुख व नगरसेविका संगीता ठोसर, पै. प्रसाद बाबर,माजी नगरसेवक भरत चौधरी, विनोद गव्हाणे, माऊली भोईटे, पोपट आंबेकर, भरत शेंडकर, किरण ठोसर, स्वप्निल कामठे, रमेश सोनवणे, विकास बधे, माणिक सोनवणे, प्रशांत बधे, नितीन घोडके, उत्तरेश्‍वर शिंदे, बाबा शेख, भाऊ कापरे, सचिन कापरे, संभाजी लोणकर उपस्थित होते.

महादेव बाबर म्हणाले, या पुलाची मागणी आम्हीच केली होती, भूमिपूजन पण आम्हीच केले. सर्व परवानग्या व पाठपुरावा आम्हीच केला आहे. त्यामुळे उद्‌घाटन पण आम्हीच केले आहे. तरी खोटे बोलून स्थानिक आमदार श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याने काम केले त्याचे श्रेय त्यालाच घेऊ द्या, खोटे बोलुन जनतेची दिशाभूल करून नये. आता आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही केलेल्या कामाच्या उद्‌घाटनात शिवसेनेलाच डावलून या आमदाराने युतीधर्म पाळला नसल्याची टीका बाबर यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.