खोटेपणाचा पुराव्यानिशी पर्दाफाश करणारच

चिखली येथील सभेत डॉ. कोल्हेंचा आढळरावांवर घणाघात

चिखली- संसदेत खूप प्रश्‍न विचारले असा डांगोरा पिटणाऱ्या खासदारांनी संरक्षण खात्याला जे 128 प्रश्‍न गेल्या 15 वर्षांत विचारले त्यात किती प्रश्‍न हे रेडझोन विषयी होते? हे आता शिवाजीराव आढळरावांनी जगजाहीर करावे. इतकेच कशाला आता पुराव्यानिशी खोटेपणाचा पर्दाफाश करणारच, अशी रोखठोक भूमिका डॉ.अमोल कोल्हे यांनी मांडली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील भागांचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी चिखली येथील सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने, स्वाती साने, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष मोरे, गणपत आहेर, आनंद यादव, काळूराम यादव आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, गल्लीत सांगायचे बैलगाडा शर्यत मीच सुरू करणार आणि दिल्लीत जाऊन मूग गिळून बसायचे. यामुळे या खासदारांनी गेल्या 15 वर्षांत काय काम केले हाच संशोधनाचा भाग आहे. येथील नागरिकांच्या घरांचा प्रश्‍न अजूनही अधांतरी आहे. मी जनतेच्या हितासाठी सक्षम आहे आणि मला प्रश्‍नांची जाण आहे. त्यासाठी आपला आवाज संसदेत घुमण्यासाठी मला निवडून द्या, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले. सुभाष मोरे म्हणाले की, या परिसरातून शरद पवार यांना सातत्याने मते दिली आहेत. त्यामुळे डॉ. कोल्हे तुम्ही निश्‍चिंत रहा असे त्यांनी नमूद केले. शरद जाधव म्हणाले की, आपण 15 वर्षे खासदार आहात, विकासासाठी किती निधी दिला? नवीन किती प्रोजेक्‍ट आणले? किती तरुणांना रोजगार दिले?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास स्वाती साने यांनी व्यक्‍त केला. प्रकाश मोरे यांनी आभार मानले.

  • 15 वर्षे काम न करणारा माणूस पुन्हा निवडून द्यायचा नाही. या युती सरकारचा राज ठाकरे पुराव्यानिशी भांडाफोड करतात. तरीही वर नाक करून बोलण्याची सवयच त्यांची आहे.
    – विलास लांडे, माजी आमदार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.