खेड-शिवापूर टोलनाका तात्काळ बंद करा

संभाजी ब्रिगेडची मागणी : तहसीलदारांना दिले निवदेन

भोर- पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्‍यावर प्रवाशांची प्रचंड आर्थिक लूट होत आहे. टोलची कालमर्यादा संपून देखील टोल वसुली केली जात आहे. टोलनाका प्रशासन या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना दिसत नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून टोल वसूल केला जात आहे. त्यामुळे सरकारने पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व टोल बंद करावेत, अशी मागणी संभाजी बिग्रेडने केली आहे. तसेच संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, तालुकाध्यक्ष प्रदीप खुटवड यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी भोरचे तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन दिले आहे.

संभाजी बिग्रेडने निवेदनात म्हटले आहे की, खेड-शिवापूर टोल नाक्‍यावरील टोल वसुलीचा कालावधी संपलेला असतानाही खेड-शिवापूर रस्त्याची नवीन निर्मिती, देखभाल व दुरुस्तीसाठी टोल वसूल केला जात आहे. हा पैसा सरळ ठेकेदारांच्या खिशात घालण्याचा घाट रस्ते विकास महामंडळ व राज्य सरकारने घातला आहे. जनतेच्या पैशावर ठेकेदार पोसले जात आहेत. बऱ्याच टोलवर खोट्या पावत्या, गाडीचा नंबर नसलेल्या पावत्या दिल्या जातात. पुणे जिल्ह्यातील सर्व टोलवर कुणाचेही बंधन नाही. कोणत्याही टोलचे ऑडिट केले जात नाही. याउलट टोलनाक्‍यावर गंभीर गुन्ह्यातील गुंड प्रवृत्तीचे लोक नियुक्त केले जातात.
रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व तहसीलदार यांनी या गंभीर विषयांची दखल घेवून जिल्ह्यातील व सातारा महामार्गावरील टोलनाके 1 जूनपासून बंद करावेत. तसेच कालमर्यादा संपल्यानंतर वसूल केलेली रक्‍कम संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावी व पुणे-सातारा महामार्गावर होणारी नित्याची वाहतूक कोंडी थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी बिग्रेडने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.