खेड पंचायत समितीत अधिकाऱ्यांकडून अपहार

चौकशीची मागणी : सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन मेळाव्यातील खर्चात तफावत

राजगुरूनगर – खेड पंचायत समितीमध्ये महिन्यापूर्वी घेण्यात आलेल्या सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन मेळाव्यासाठी झालेल्या खर्चात तफावत आढळून आली आहे. या खर्चाच्या चौकशीची मागणी सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर यांच्यासह सर्वच सदस्यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास योजनेद्वारे खेड पंचायत समितीच्या माध्यमातून समितीच्या सभागृहात 7 मार्चला सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला होता. त्यासाठी 78 हजार रुपयांची तरतूद शासनाने केली होती. त्यात मार्गदर्शन करणारे वक्‍ते, सत्कार साहित्य, उपस्थित शिबिरार्थिंना जेवण व स्मृतीचिन्ह आदी खर्चाला मान्यता होती.

स्मृतीचिन्हासाठी 8 हजार 500 आणि जेवणासाठी 45 हजार रुपये खर्च करण्यात आले. तर वरिष्ठ सहायक अजय मुद्रांकित यांच्या नावे 15 हजार रुपये काढण्यात आले. या सर्व खर्चाला सभेची मान्यता घेण्यासाठी प्रयत्न झाल्यावर उपसभापती पोखरकर यांना अनेक बाबी खटकल्या. ते स्वत: या शिबिराला उपस्थित होते. शिबिराला अवघे 100 ते 150 विद्यार्थी उपस्थित होते. तरीही जेवणाचे बिलापोटी 45 हजार रुपये कसे दिले? पोखरकर यांनी जेवण देणारे पाटील केटरर्सच्या मालकाला खेड पंचायत समितीमध्ये बोलावून पंचायत समितीच्या अधीक्षक व काही कर्मचारी यांच्या समक्ष विचारले. तेव्हा 190 लोक जेवले व प्रत्येकी 110 प्रमाणे 21 हजार रुपयांची रक्कम आपण घेतली. आपल्या नावे 45 हजार रुपयांचा धनादेश काढण्यात आला व उर्वरीत 23 हजार रुपये रोख स्वरूपात एका अधिकाऱ्याला ठरल्याप्रमाणे परत केले असे त्याने सांगितले. यात पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची बाब प्राथमिकदृष्ट्या समोर आली होती.

सोमवारी (दि. 8) पंचायत समितीची मासिक सभा झाली या सभेला सभापती, उपसभापतीसह 12 सदस्य उपस्थित होते. या मासिक सभेत पोखरकर यांनी ही माहिती आणि त्यातील तफावत मांडली. त्यावर सभागृहाने नापसंती व्यक्‍त करीत या प्रकरणाच्या चौकशीचा मागणी ठराव केला.

पंचायत समितीच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी महिला बाल कल्याणमार्फत पश्‍चिम भागातील महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली होती. यामध्येही अपहार झाल्याची बाब प्रशिक्षणार्थिंनी अधिकारी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याने हा घोटाळा उघड झाला होता.आताही सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन मेळाव्यासाठी झालेल्या खर्चात तफावत आढळून आल्याने उपसभापती पोखरकर यांनी मासिक सभेत प्रश्‍न उपस्थित करून त्याचा अहवाल प्रशासनाच्या विरोधात आलेला असतानाच दुसऱ्यांदा तोच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

  • सोमवारी (दि. 8) झालेल्या मासिक सभेत सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन मेळाव्यासाठी झालेल्या खर्चात तफावत बाबतचे इतिवृत्त पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यांच्याकडून योग्य निर्णय घेतला जाईल. यात दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल.
    -बाळासाहेब ढवळे-पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.