खेडच्या पश्‍चिम भागातील पाणी प्रश्‍न पेटला

चासकमान धरणांतर्गत बुडीत क्षेत्रातील ग्रामस्थांचा तहसीलदार, प्रांत कार्यालयावर मोर्चा

राजगुरूनगर- खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी चासकमान धरणांतर्गत बुडीत क्षेत्रात भीमानदीवर बंधारे बांधण्याच्या मागणीसाठी या गावातील ग्रामस्थांनी खेड तहसीलदार व प्रांत कार्यालयावर आज (सोमवारी) मोर्चा काढला.
या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पश्‍चिम विभाग सरपंच संघटनेचे संघटक पांडुरंग जठार यांनी केले. यावेळी सदाशिव सोनवणे, धोंडिभाऊ दरेकर, हरिदास जठार, अंबर वाळूंज, नामदेव गोपाळे, नारायण कदम, सोमनाथ शिर्के, शशिकांत शेलार, भोलेनाथ कौदरे सचिन थोरात, धुवोलीचे सरपंच शैला वाघ, उपसरपंच शरद जठार, भरत हांडे, जिजाबा नांगरे, पप्पू जठार, विठ्ठल सोळसे, योगिता शेटे, बाळासाहेब शेटे, सुनील सोळसे, सीमा जठार, संदीप शेलार अनिल सोळसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मागण्याचे निवेदन तहसीलदार सुचित्रा आमले यांना देण्यात आले.
खेडच्या पश्‍चिम भागातील वांजळे, धुवोली मोरोशी, धामणगाव खुर्द, शिरगाव आदी गावातील नागरिकांना चास कमान धरणाचे पाणी खाली सोडल्यानंतर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई दरवर्षी निर्माण होते. लोकप्रतिनिधी केवळ आश्‍वासने देतात तर अधिकारी वर्ग केवळ सर्वेक्षणाचे घोडे दामटवत आहे. याभागातील ग्रामस्थ मात्र, पाण्यासाठी वणवण करीत आहेत. अखेर 25 वर्षांनंतर आता याचा उद्रेक आता सुरु झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे. शेतकऱ्यांना शेती करता यावी यासाठी चास कमान धरणांतर्गत भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

 • चास कमान धरणातून नियोजन न करता बेसुमार पाणी सोडण्यात येते. त्यामुळे या गावांना मोठी पाणी टंचाई निर्माण होत आहे. वांजळे, धुवोली, मोरीशी शिरगाव परिसरात भीम नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधावे अशी अनेक दिवसांची मागणी आहे मात्र, बुडीत बंधारे बांधण्याकडे शासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. सरकाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आज आंदोलन केले आहे उद्याचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
  – विठ्ठल सोळसे, ग्रामस्थ
 • चासकमान बुडीत क्षेत्रात बंधारे झाले नाहीत तर चासकमान धरणातून पाणी खाली जावून देणार नाही, जल समाधी, जेलभरो आंदोलन करावे लागले तरी चालेल. भामाआसखेड, चासकमान आणि कळमोडी धरणातर्गत जवळपास 100 गावांचा प्रश्‍न आहे. या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही. 23 बंधाऱ्यांना तांत्रिक मान्यता मिळाली होती. त्यापैकी 3 मंजूर झाले. पुन्हा त्याचे “री इस्टीमेट’ केले जात आहे. यात शासनाचे अपयश आहे. बंधारे झाले नाही तर याभागातील जनतेचा मोठा उद्रेक होईल.
  – अतुल देशमुख, सदस्य, जिल्हा परिषद
 • चासकमान धरणातील पाण्याचे नियोजन केले आहे त्याप्रमाणे पाणी सोडले गेले आहे या भागातील शेतकऱ्यांची अडचण असेल तर ती सोडविण्यासाठी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येथील. धरणांतर्गत बुडीत क्षेत्रात बंधारे बांधण्यासाठी आणि ही कामे तात्काळ करण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला जाईल.
  – सुचित्रा आमले, तहसीलदार, खेड
 • या आहेत मागण्या
  यावर्षी दुष्काळ पडल्याने शासनाने वाडा सर्कल दुष्काळग्रस्त जाहीर करावे, या मंडल मधील नागरिकांची वीज बिले माफ करावीत, शाळेची फी माफ करावी,बुडीत क्षेत्रात धुवोली वांजळे, मोरोशी परिसरात भीमा नदीवर बंधारे बांधावेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)