खूनप्रकरणी एकाला जन्मठेप

गाडी मागे घेण्याच्या वादातून खून; राजवाड्यावरील घटना
सातारा,दि.25(प्रतिनिधी)

दुचाकी मागे घेण्याच्या कारणावरून कोयत्याने वार करून सुरेश पांडूरंग अहिरे यांचा खुन केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रकाश रामचंद्र सणस (रा.जकातवाडी,ता.सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधिश राजेंद्र सावंत यांच्या कोर्टाने ही शिक्षा सुनावली. याप्रकरणी सन 2014 साली शाहूपुरी पोलीस ठाण्यात सणस याच्या विरोधात मृत अहिरे यांच्या मुलाने तक्रार दिली होती.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.5 एप्रिल 2014 रोजी राजवाडा येथील राजधानी टॉवर येथे दुचाकी मागे घेण्याच्या कारणावरून मृत सुरेश अहिरे यांचा आरोपी प्रकाश सणस याच्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर आरोपी सणस याने त्या वादाचा राग मनात धरून त्याच दिवशी दुपारी राजवाडा येथे सुरेश अहिरे यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले होते. आरोपी सणस याने मृत अहिरे यांच्या डोक्यात,छातीवर तसेच उजव्या डोळ्यावर गंभीर वार केले होते.

त्यात अहिरे यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. घटना घडल्यानंतर मृत अहिरे यांच्या मुलाने आरोपी सणस याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाची तक्रार दिली होती. दाखल तक्रारीनुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रविंद्र पिसाळ यांनी आरोपी प्रकाश सणस याला बेड्या ठोकल्या होत्या.

त्यानंतर पिसाळ यांनी या घटनेचा तपास करून आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात पाच वर्षे सुरू होती. यावेळी काही साक्षीदार,वैद्यकीय अहवाल व सरकारी वकील मिलींद ओक यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन प्रमुख जिल्हा न्यायाधिश राजेंद्र सावंत यांनी प्रकाश सणस याला जन्मठेप व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्याकामी पोलीस प्रॉसिक्युशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कबुले, पोलीस हवालदार अविनाश पवार, रवी जाधव, क्रांती निकम यांनी कामकाज पाहिले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.