खुशखबर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

पाणीसाठयात 12 तासात 0.15 टीएमसीची वाढ

प्रभात वृत्तसेवा
पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लागली आहे. गेल्या 48 तासात या तीनही धरणात सुरू असलेल्या पावसाने गेल्या 12 तासात सुमारे 0.15 टीएमसी पाणीसाठयात वाढ झाली आहे. ही वाढ नगण्य असली तरी  मोठया प्रमाणात ओढे-नाल्यांमधून पाणी येत असल्याने धरणाच्या पाणीसाठयात वाढ होण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
गेल्या 48 तासात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक 199 मिमी पावसाची नोंद टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली आहे. तर पानशेतधरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे 120 मिमी पाऊस झाला असून वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 102 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहीती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, पावसाचा जोर शुक्रवारी रात्रीही कायम असल्याने पुढील दोन दिवस पाऊस कायम राहिल्यास धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरूवात होण्याची शक्‍यता या विभागाकडून वर्तविण्यात आली. या पावसाने खडकवासला धरणाच्या पाण्यात 0.2 टीएमसी, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 0.10 टीएमसी तर वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 0.3 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. पुणे शहराला सध्या दिवसा 0.3 टीएमसी पाणी लागत असून वाढलेले पाणी मोजायचे झाल्यास महापालिकेस पाच दिवस पुरेल एवढा पाणीसाठा वाढला असल्याचे सांगण्यात आले.
———————–

Leave A Reply

Your email address will not be published.