खुटबाव बाजारात बैलजोडीला मिळाली 1 लाख 71 हजारांची किंमत

केडगाव- खुटबाव (ता. दौंड) येथील नव्यानेच सुरू झालेल्या जनावरांच्या आठवडे बाजारात एका बैलजोडीसाठी तब्बल 1 लाख 71 हजार रुपये किंमत मिळाली. या बैलजोडीची ग्रामस्थांनी मिरवणूक काढली आहे. आठवडे बाजार सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच बाजारी विक्रमी उलाढाल झाली आहे, अशी माहिती सरपंच शिवाजी थोरात यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात यवत आणि चाकण या दोनच ठिकाणी जनावरांचा बाजार भरत होता; परंतु मागील आठवड्यापासून माजी आमदार रमेश थोरात यांचे गाव असलेल्या खुटबाव येथेही जनावरांचा बाजार सुरू करण्यात आला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दौंड बाजार समितीच्या लेखी पत्रानुसार बाजाराचे उद्‌घाटन करण्यात आले. रविवारी सुरू असणाऱ्या जनावरांच्या बाजारात विक्रमी म्हणजे 25 लाख रुपयांची उलाढाल झाली असून एका बैलजोडीसाठी तब्बल 1 लाख 71 हजार रुपये देऊन खरेदी करण्यात आली. यवत (ता. दौंड) येथील शेतकरी दिगंबर लक्ष्मण दोरगे यांनी ही बैलजोडी खरेदी केली आहे. या बाजारामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणार आहे. यावेळी मोहन थोरात, सुभाष देशमुख, शरद शेलार, दामोदर थोरात, दिलीप थोरात, माऊली शेलार, नानासाहेब थोरात आणि सचिन शेलार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.