खिळखिळ्या पीएमपीवर राजगुरुनगरवासिय “समाधानी’

रामचंद्र सोनवणे

राजगुरूनगर- महत्त्वाच्या वेळी बंद पडणाऱ्या बस… गर्दीच्या ठिकाणी बसथांबाच नाही… बसमधील अंतर्गत आसनव्यवस्थेह बस खिळखिळी… अशा अवस्थेत सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गावर गेल्या 26 वर्षांपासून तत्कालीन पीएमटी-पीसीएमटी व आताची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीची बससेवा राजगुरूनगरापर्यंत धावत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सेवेवर राजगुरूनगरवासीय समाधानी असल्याचे चित्र आहे.
राजगुरुनगर ते पुणे मार्गावर पुणे महानगरपालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणारी पीएमपी बस सेवा आहे. पुणेस्टेशन ते राजगुरुनगर मार्गावर दररोज 18 आणि राजगुरुनगर ते भोसरी शटल सेवासाठी 12 अशा 30 बस धावतात. या बसमधून दररोज सुमारे सात हजार विद्यार्थी, 5 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आणि त्याच पटीत इतर प्रवासी प्रवास करीत असतात; मात्र या सेवेचे अजूनही पाहिजे त्या प्रमाणात सक्षमीकरण झालेले नाही. राजगुरुनगर-पुणे मार्गावर जुन्या खिळखिळ्या झालेल्या बस धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडीमुळे या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आली आहे, अनेक बस रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांची अनेकदा गैरसोय होत आहे.
सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या या मार्गावर बसची संख्या मात्र अपुरी पडत आहे. राजगुरुनगर ते पुणे असा सुमारे 40 किलोमीटरचा प्रवास असून या मार्गावर बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या त्यासाठी 50 रुपयांपर्यंत तिकीट आहे. रोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. चाकण, भोसरी औद्योगिक क्षेत्र असल्याने बसने प्रवास करणाऱ्या कामगारांची मोठी संख्या आहे. पुणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने प्रवाशांना तासन्‌तास बसेसमध्येच अडकून बसावे लागत आहे.
पुणे ते राजगुरुनगर या मार्गावर थेट 18 बसेस दररोज धावतात, त्या रोज दोन फेऱ्या करतात. भोसरी ते राजगुरुनगर शटल बस सेवेसाठी 12 बस तीन फेऱ्या रोज करतात. मात्र, पुणे येथे जाणारे प्रवासी, विद्यार्थी व नोकरदारांची संख्या मोठी आल्याने या बस अपुऱ्या पडत आहेत. भोसरीपर्यंत गेलेल्या प्रवाशांना पुढे जाण्यासाठी अडचण होते. या बस थेट पुणे स्टेशनपर्यंत नेण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

 • स्थानिकांचा आडमुठेपणा
  पुणे येथून राजगुरुनगरपर्यंत डिसेंबर 1992 पासून अविरत बससेवा सुरु आहे. सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग असताना येथे जागेअभावी बसथांबा, स्थानक नाही. यामुळे बसने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. बस येईपर्यंत त्यांना ताटकळत उभे राहावे लागते. राजगुरुनगर शहरातून मोठी प्रवासी संख्या आहे. उन, वारा, पाऊस यामध्ये प्रवाशांना रस्त्यावर थांबावे लागत आहे. येथे प्रवाशांसाठी स्वच्छतागृह नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. स्थानिक नागरिक त्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याने अडचण होते एवढेच काय या ठिकाणी बसेस थांबू दिल्या जात नाहीत. त्या पुणे-नाशिक महामार्गावर उभ्या कराव्या लागतात. यामुळे वाहतूककोंडी तर होतेच शिवाय प्रवाशांची मोठी गैरसोय होते.
 • पाससाठी भोसरीची वाट
  पुण्यात जाणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरदार यांची संख्या जास्त असल्याने ते मासिक पास काढून बसने प्रवास करीत आसतात. मात्र पास केंद्र भोसरी येथे असल्याने प्रवासी, विद्यार्थी व कामगारांना अडचणीचे ठरले आहे. राजगुरुनगर शहरातील पास केंद्र सुरू करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न आहेत. मात्र ते सुरू न झाल्याने गैरसोय होत आहे.
 • अनेक अडचणींतूनही अविरत सेवा
  पुण्यावरून आलेल्या पीएमपीएमएल बसेस येथे वळविण्यासाठी जागा नसल्याने त्या दीड किलोमीटर लांब डाक बंगल्याजवळ जाऊन फिरून येतात. पुणे-नाशिक महामार्गावर दररोज वाहतूककोंडी होत असल्याने बस चालवताना, वळवताना मोठे अडथळे येत आहेत. प्रशस्त असे बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुणे महानगर पालिका आणि राजगुरुनगर नगरपरिषद यांच्यात समन्वय करून बस थांबविण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. गेली 26 वर्षांपासून पुण्यावरून आलेल्या बसेस येथील बाजार समितीच्या जवळ पुणे-नाशिक महामार्गावर थांबविण्यात येत आहेत. त्याचा प्रवासी व वाहतूककोंडीवर मोठा परिणाम होतो, असे असतानाही पीएमपी प्रवाशांना अविरतपणे देत सेवा देत आहे.
 • राजगुरूनगरात पीएमपीच्या प्रवाशांसाठी बसस्थानक नसल्याने ऊन-वारा-पाऊस झेलत रस्त्यावरच उभे राहावे लागते. महामार्गावर खिळखिळ्या झालेल्या गाड्या सोडण्यात येतात. या मार्गावर नवीन बसेच दिल्या पाहिजेत. पुणे स्टेशनला जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने बसेस अपुऱ्या पडत आहेत, त्यांची गैरसोय होत आहे. पास केंद्र भोसरी व पुणे येथे असल्याने मोठी गैरसोय होत आहे. पीएमपीमध्ये कार्यक्षम अधिकारी नसल्याने प्रवाशांचे प्रश्‍न सुटत नाहीत. बाह्यवळण रस्त्याचे काम होत नसल्याने वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मोठा फटका बसत आहेत.
  – किरण भालेकर, अध्यक्ष, प्रवासी संघटना खेड तालुका
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)